सिंधुदुर्ग : विजयदुर्गचा इतिहास अनुभवला, महोत्सवाचा दुसरा दिवस, अमर अडके यांनी दिली किल्ल्याबाबत माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 18:32 IST2018-01-01T18:28:30+5:302018-01-01T18:32:33+5:30
ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याला आठशे वर्षांचा इतिहास आहे. या किल्ल्याची महती फार मोठी असून ६४ दुर्गांपैकी अजूनही बळकट अशा स्थितीत उभा असलेला हा किल्ला आहे. अशा शब्दांत किल्ल्याविषयी ऐतिहासिक महत्त्व सांगत विजयदुर्ग किल्ल्याचा इतिहास इतिहासतज्ज्ञ डॉ. अमर अडके यांनी विजयदुर्ग येथे कथन केला.

देवगड तालुक्यातील विजयदुर्ग किल्ल्याच्या प्रवेशव्दाराजवळ महोत्सवानिमित्ताने डॉ. अमर अडके यांनी किल्ल्याबाबत माहिती दिली.
देवगड : ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला हा स्थापत्य शास्त्राच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा किल्ला आहे. विजयदुर्ग हा किल्ला तीन तटबंदींच्या सहाय्याने बांधलेला आहे. या किल्ल्यावर तीनही शक्तींची प्रतीके असून बलभीम मारूती, रामेश्वर, भवानीमाता ही त्याची प्रतीके आहेत. या किल्ल्याला आठशे वर्षांचा इतिहास आहे. या किल्ल्याची महती फार मोठी असून ६४ दुर्गांपैकी अजूनही बळकट अशा स्थितीत उभा असलेला हा किल्ला आहे. अशा शब्दांत किल्ल्याविषयी ऐतिहासिक महत्त्व सांगत विजयदुर्ग किल्ल्याचा इतिहास इतिहासतज्ज्ञ डॉ. अमर अडके यांनी विजयदुर्ग येथे कथन केला.
विजयदुर्ग येथे विजयदुर्ग महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात रविवारी सायंकाळी ४ वाजता डॉ. अमर अडके यांच्यासोबत अनेक पर्यटकांनी तसेच इतिहासप्रेमी व विजयदुर्गवासीयांनी विजयदुर्ग किल्ल्याच्या इतिहास अनुभवला. शंभरहून अधिक जनसमुदायाबरोबर तब्बल चार तास डॉ. अमर अडके यांनी विजयदुर्ग किल्ला फिरत किल्ल्याविषयीची माहिती दिली.
तीन दिवस सुरू असलेल्या या विजयदुर्ग महोत्सवाला अनेक पर्यटकांनी तसेच मान्यवर व्यक्तींनी भेटी दिल्या. असाच महोत्सव दरवर्षी विजयदुर्ग येथे करण्यात येणार आहे. या जल्लोषी कार्यक्रमांमुळे गेले तीन दिवस विजयदुर्ग परिसर पर्यटकांनी फुलून गेला आहे.
जल्लोषात निरोप
विजयदुर्ग येथे सुरू असलेल्या विजयदुर्ग महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी किल्ले बांधणी स्पर्धा, वाळूशिल्प, रांगोळी प्रदर्शन, मर्दानी खेळ, नौकानयन स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. तसेच सरत्या वर्षाला फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषात निरोप देण्यात आला.