सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक; शासन सकारात्मक, वैभव नाईक यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 04:10 PM2020-09-24T16:10:56+5:302020-09-24T16:15:12+5:30

नौका प्रवासी वाहतूक विमा रक्कम ५ लाखांवरून १ लाख करणे, सिंधुदुर्गमध्ये जलमार्गावरील प्रवासी वाहतूक क्षमता, मुदत वाढविणे यांसह सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनच्या अन्य मागण्यांबाबत आमदार वैभव नाईक यांनी मुंबई येथे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी यांची भेट घेतली.

Sindhudurg fort passenger transport; Governance positive | सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक; शासन सकारात्मक, वैभव नाईक यांची माहिती

सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक; शासन सकारात्मक, वैभव नाईक यांची माहिती

googlenewsNext
ठळक मुद्देसिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक; शासन सकारात्मक, वैभव नाईक यांची माहितीवेधले मेरिटाईम बोर्डाचे लक्ष, विविध मागण्या सादर

मालवण : नौका प्रवासी वाहतूक विमा रक्कम ५ लाखांवरून १ लाख करणे, सिंधुदुर्गमध्ये जलमार्गावरील प्रवासी वाहतूक क्षमता, मुदत वाढविणे यांसह सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनच्या अन्य मागण्यांबाबत आमदार वैभव नाईक यांनी मुंबई येथे महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी यांची भेट घेतली.

संघटनेच्या मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली. त्यावर डॉ. सैनी यांनी नौका प्रवासी वाहतूक विमा ५ लाखांवरून १ लाख करण्याबरोबरच इतर समस्याही सोडविल्या जातील अशी ग्वाही दिली. वाळू व्यावसायिकांच्या प्रश्नांबाबत यावेळी सकारात्मक चर्चा झाली.

गेल्यावर्षी वादळी हवामान व त्यानंतर कोरोनाच्या संकटामध्ये पर्यटकांची संख्या कमी झाली असून मार्च २०२० पासून पर्यटन व्यवसाय बंद झाला आहे. प्रवासी नौका व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या व्यावसायिकांना वाचविणे गरजेचे आहे. याकडे आमदार नाईक यांनी सैनी यांचे लक्ष वेधले.

महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने प्रवासी वाहतूक बोटीचा सर्व्हे करण्यासाठी सर्व्हेअरची नियुक्ती प्रत्येक जिल्हा कार्यालयात करणे आवश्यक आहे. १० टनाखाली असलेल्या नौकांचा सर्व्हे करण्याचा अधिकार प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांना देण्यात यावा. मालवण बंदर धक्का ते सिंधुदुर्ग किल्ला व तारकर्ली या जलमार्गावरील प्रवासी वाहतूक क्षमता वाढवावी.

सध्या प्रवासी वाहतूक क्षमता प्रवासी १० व चालक व खलाशी २ अशी एकूण १२ असते. ती वाढवून किमान २५ प्रवासी वाहतूक करण्याचा परवाना द्यावा. जर १० संख्या ठरविल्यास आजच्या महागाईत ते परवडणारे नाही. इनलॅण्ड व्हेसल अ‍ॅक्ट १९१७ अंतर्गत करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या नोंदणीचे शुल्क ठरविले होते.

त्यानंतर शुल्कामध्ये फेरफार केला असून मालकी हक्कात बदल करणे व नौकेचे इंजिन बदलणे हे शुल्क कमी केले नाही. तसेच नोंदणी प्रमाणपत्राची दुय्यम प्रत मिळणे व नोंदणी प्रमाणापत्रावर कर्जाची नोंद करणे यामध्ये यावर किती शुल्क वसूल करावे हे ठरविलेले नाही. त्याबाबत योग्य निर्णय व्हावा.

विम्याची रक्कम कमी करण्याची मागणी

मालवण बंदर धक्का ते सिंधुदुर्ग किल्ला व तारकर्ली या जलमार्गावर अनेक प्रवासी वाहतूक नौका आहेत. या व्यावसायिकांनी २०२०-२१ या वर्षाकरिता प्रवासी वाहतूक परवाना आॅनलाईन मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केले असता त्यांच्याजवळ ५ लाखांचा प्रवासी विमा काढला नसल्याने त्यांचे प्रस्ताव नामंजूर होत मागे आले आहेत.

नौका प्रवाशांचा विमा ५ लाखांप्रमाणे उतरविल्यास त्यासाठी एका नौकेला सुमारे ३० हजारांचा हप्ता भरावा लागणार असून तो व्यावसायिकांना परवडणारा नाही. त्यामुळे विम्याची रक्कम कमी करून पूर्वीप्रमाणे १ लाख रुपये करण्यात यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनने आमदार नाईक यांच्याकडे केली होती.

Web Title: Sindhudurg fort passenger transport; Governance positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.