Sindhudurg District Bank Election : 'महाविकास आघाडीचे सर्व संचालक निवडून येतील'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2021 18:30 IST2021-12-04T18:24:30+5:302021-12-04T18:30:49+5:30
भ्रष्टाचार मुक्त व पारदर्शक कारभार करणारी राज्यातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्हा बँक ठरली आहे.

Sindhudurg District Bank Election : 'महाविकास आघाडीचे सर्व संचालक निवडून येतील'
ओरोस : जिल्हा बँकेची उलाढाल २०१५ मध्ये पंधराशे कोटी होती. गेल्या पाच वर्षात त्यात ९०० कोटींची वाढ झाली असून चोवीसशे कोटीवर उलाढाल पोहोचली आहे. सतीश सावंत यांनी संचालकांच्या समन्वयातून या कालावधीत शेतकरी हिताचे निर्णय घेतले. भ्रष्टाचार मुक्त व पारदर्शक कारभार करणारी राज्यातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्हा बँक ठरली आहे. यामुळे महाविकास आघाडीने एक मुखाने सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत सर्वच्या सर्व १९ संचालक महाविकास आघाडीचे निवडून येतील, असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून ही निवडणूक महाविकास आघाडी कशाप्रकारे लढविणार आहे, याची माहिती देण्यासाठी सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवनमध्ये शनिवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, राष्ट्रवादीचे व्हिक्टर डांटस, काँग्रेसचे विद्याप्रसाद बांदेकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, जान्हवी सावंत, नागेंद्र परब, संजय आंग्रे, आर टी मर्गज, मनीष पारकर आदी उपस्थित होते.
यावेळी खासदार राऊत म्हणाले, गेल्या पाच वर्षातील मध्यंतरीच्या काळात काही लोकांनी राजकीय दबाव आणत चुकीच्या पद्धतीने कोट्यावधीची कर्ज प्रकरणे मंजूर करून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा दबाव झुगारात सतीश सावंत यांनी शेतकरी हितासाठी निर्णय घेतला. बँकेत कोणताही घोटाळा होऊ दिलेला नाही. जिल्हा बँक निवडणूक विकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेत जागावाटप निश्चित केले होते. त्यानुसार ही जिल्हा बँक निवडणूक लढविण्यात येत आहे.
या निवडणुकीत जिल्ह्यातील मतदार पुन्हा सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली सर्वच्या सर्व संचालक निवडून देतील, असा आपल्याला विश्वास आहे. त्यानंतर पुढील पाच वर्षात जिल्हा बँकेची आर्थिक उलाढाल साडेतीन हजार कोटींवर जाईल, असे सांगितले. तसेच काही लोकांनी पक्षीय नव्हे तर व्यक्तिगत स्वार्थासाठी आणलेला दबाव झुगारून सतीश सावंत यांनी बाणेदारपणा दाखविला. तसाच कारभार यापुढेही सतीश सावंत व त्यांचे संचालक निवडून आल्यानंतर करतील. ही बँक लुटारूपासून वाचवतील, असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.