सिंधुदुर्ग : मांगेली पर्यटनस्थळ विकसित करणार : दिलीप पांढरपट्टे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 16:07 IST2018-08-18T16:05:28+5:302018-08-18T16:07:13+5:30
दोडामार्गचे वैभव असेच कायम टिकविण्यासाठी तसेच मांगेली पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी देणार आहे, त्यासाठी या भागातील लोकप्रतिनिधींनी पुढे आले पाहिजे, असे मत जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी साटेली-भेडशी येथे वन विभागाच्या विश्रामगृह नूतनीकरण प्रसंगी केले.

साटेली-भेडशी विश्रामगृह नूतनीकरण कार्यक्रमात जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांचा समाधान चव्हाण यांनी सत्कार केला. यावेळी सुभाष पुराणिक,मनोज जोशी उपस्थित होते.
दोडामार्ग : दोडामार्गचे वैभव असेच कायम टिकविण्यासाठी तसेच मांगेली पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी देणार आहे, त्यासाठी या भागातील लोकप्रतिनिधींनी पुढे आले पाहिजे, असे मत जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी साटेली-भेडशी येथे वन विभागाच्या विश्रामगृह नूतनीकरण प्रसंगी केले.
दीडशे वर्षांपूर्वी ज्यावेळी रत्नागिरी हा जिल्हा होता, त्या अगोदरपासून साटेली-भेडशी येथे वन विभागाचे विश्रामगृह कार्यरत होते. मात्र, गेली अनेक वर्षे याकडे दुर्लक्ष होते. या वन विभागाच्या विश्रामगृहाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. याचा शुभारंभ जिल्हाधिकारी पांढरपट्टे यांच्या हस्ते झाले.
यावेळी उपजिल्हाधिकारी मनोज जोशी, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र्र म्हापसेकर, साटेली-भेडशी सरपंच नामदेव धरणे, उपवनसंरक्षक समाधान चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक सुभाष पुराणिक, दोडामार्ग वनक्षेत्रपाल अर्जुन गमरे, बुधाजी मोरगावकर, संदीप धरणे, प्रवीण गवस आदी उपस्थित होते.
यावेळी पांढरपट्टे म्हणाले, आपणाला दोडामार्गमधील प्रत्येक गावाची माहिती आहे. येथील प्रत्येक जण आज गोवा राज्यावर अवलंबून आहे. एका बाजूला गोवा राज्य व एका बाजूला कोल्हापूर जिल्हा हे या दोडामार्गचे वैभव आहेत. दोडामार्गमधील मांगेली धबधबा हा आंबोलीप्रमाणे दोडामार्गचे भूषण आहे. येथील पर्यटन स्थळे विकसित झाली पाहिजे ही मागणी योग्य आहे. मांगेली धबधबा विकसित करण्यासाठी जिल्हा नियोजनमधून आपण नक्की निधी देऊ, असे पांढरपट्टे यांनी सांगितले.
यावेळी दोडामार्ग वन विभागाच्या मान्यवर मंडळींचे स्वागत करण्यात आले. श्रीकांत केसरकर, राजाराम टोपले, भाऊ टोपले, बंटी टोपले, गजानन देऊलकर, ग्रामस्थ, वन कर्मचारी, वनपाल उपस्थित होते. सूत्रसंचालन सुहास देसाई यांनी केले.
७५ टक्के जनता गोव्यावर अवलंबून
राजेंद्र्र म्हापसेकर यांनी सांगितले की, दोडामार्ग तालुका निर्माण होऊन देखील येथील ७५ टक्के जनता गोव्यावर अवलंबून आहे.
रोजगार गोव्यात, खरेदी-विक्री गोव्यात, पेट्रोल-डिझेल, आरोग्य सेवा या सर्व महत्त्वाच्या गरजांसाठी गोवा येथेच धाव घ्यावी लागते. त्यामुळे येथील पर्यटन स्थळे विकसित होणे आवश्यक आहे.