सिंधुदुर्ग : बांधकाम, वनविभाग अधिकारी मुजोर, राजन तेलींचा आरोप : दीपक केसरकर यांनी राजीनामा द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 12:39 IST2017-12-26T12:32:32+5:302017-12-26T12:39:35+5:30
मोर्ले, पारगड रस्त्याप्रश्नी बांधकामसह वनविभागाचे अधिकारी दिशाभूल करीत आहेत. ते आमच्याशी खोटे बोलत आहेत. जर रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर या दोन्ही अधिकाऱ्यांच्या विरोधात भाजप आक्रमक भूमिका घेईल त्यांना सोडणार नाही, असा स्पष्ट इशारा भाजपचे माजी आमदार राजन तेली यांनी दिले आहे.

सावंतवाडी : मोर्ले, पारगड रस्त्याप्रश्नी बांधकामसह वनविभागाचे अधिकारी दिशाभूल करीत आहेत, असा आरोप भाजपचे माजी आमदार राजन तेली यांनी केले आहेत.
सावंतवाडी : मोर्ले, पारगड रस्त्याप्रश्नी बांधकामसह वनविभागाचे अधिकारी दिशाभूल करीत आहेत. ते आमच्याशी खोटे बोलत आहेत. जर रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर या दोन्ही अधिकाऱ्यांच्या विरोधात भाजप आक्रमक भूमिका घेईल त्यांना सोडणार नाही, असा स्पष्ट इशारा भाजपचे माजी आमदार राजन तेली यांनी दिले आहे.
जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांवर पालकमंत्र्यांचा वचक नसल्यानेच अधिकारी कामचुकार बनले आहेत. त्यामुळे केसरकर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी तेली यांनी केली आहे. ते सावंतवाडी येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष महेश सारंग, मंगेश तळवणेकर, दादा बेळणेकर आदी उपस्थित होते.
मोर्ले, पारगड रस्त्याची निविदा झाली आहे. फक्त काम सुरू करा, असे लेखी पत्र देणे गरजेचे होते. पण तसे पत्र दिले गेले नाही. त्यामुळे मोर्ले ग्रामस्थ उपोषणाला बसले होते. पण ग्रामस्थांची दिशाभूल करण्यासाठी उपवनसंरक्षक चव्हाण यांनी आपण वनविभागाच्यावतीने परवानगी देतो असे सांगितले. पण प्रत्यक्षात परवानगी दिली नाही. तसेच जाग्यावर कामही सुरू झाले नाही.
मोर्ले येथे गेलो होतो, पण तेथे काम सुरू झाले नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता अधिकाऱ्यांनी उपोषणावेळी एक सांगितले आणि प्रत्यक्षात तेथे काम सुरूच झाले नाही.
वनविभागाने ही झाडे तोडली नाहीत. त्यामुळे आम्ही प्रत्यक्षात गेल्यावर तेथे काम सुरू केले. पण यावेळी अधिकाऱ्यांचा असहकार दिसला. याला पालकमंत्री केसरकर जबाबदार आहेत.
जर या कामाला परवानगी नव्हती तर त्यांनी काम करण्याचे आश्वासन कसे काय दिले, निविदा कशी काय काढली, असा सवाल करत अधिकारी ग्रामस्थांना योग्य वागणूक देत नाहीत. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी करणार आहे. यापुढे भाजपचे कार्यकर्ते शांत बसणार नसून आक्रमक होऊन अधिकाऱ्यांकडून काम करून घेतील.
अधिकाऱ्यांची मुजोरी वाढली आहे. पालकमंत्री केसरकरांचे कोणताही अधिकारी ऐकत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे केसरकर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही तेली यांनी केली आहे.
तेली यांनी बांधकामचे कार्यकारी अभियंता सुरेश बच्चे तसेच वनविभागाचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांच्यावरही कारवाईची मागणी केली आहे. याबाबत आम्ही बांधकाम व वनमंत्र्यांची भेट घेणार, असे त्यांनी स्पष्ट केले.
सहाय्यक पोलीस निरीक्षकांवर कारवाई करा
सावंतवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरूण जाधव यांंनी शिवचरित्रकार संभाजी भिडे यांच्या सभेबाबत घेतलेली भूमिका योग्य नाही. ते मुद्दामहून भांडण वाढवतात. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी आमची मागणी असून याबाबत मी स्वत: पोलीस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम यांना बोललो आहे. पोलिसांनी शांतता प्रस्थापित करायची असते हे बिघडवण्याचे काम करीत आहेत, असा आरोप माजी आमदार राजन तेली यांनी केला.