मूक जिद्दीच्या कलेला सुगंधी उटण्याचा दरवळ !
By Admin | Updated: October 10, 2014 23:02 IST2014-10-10T21:47:19+5:302014-10-10T23:02:04+5:30
बाहेर प्रचाराचे फटाके फुटताहेत. पण, ‘त्यांच्या’ विश्वात सुरू आहे ती दिवाळीची लगबग.

मूक जिद्दीच्या कलेला सुगंधी उटण्याचा दरवळ !
रत्नागिरी : बाहेर प्रचाराचे फटाके फुटताहेत. पण, ‘त्यांच्या’ विश्वात सुरू आहे ती दिवाळीची लगबग. कारण त्यांच्या उत्साहाचा सण अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपलाय. कुणाला बोलता येत नाही, तर कुणाला ऐकू येत नाही, तरीही साऱ्यांचा उत्साह एकच, साऱ्यांची आकांक्षा एकच. दिवाळीत स्वयंस्फूर्तीने आपली कला सादर करून शाळेसाठी काहीतरी करण्याची. ही लगबग सुरू आहे, रत्नागिरीतील कै. केशव परशुराम अभ्यंकर मूकबधिर विद्यालयात!
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. या रणधुमाळीत दिवाळी खरेदीची चर्चा बाहेरच्या जगात थोडी मागे पडली आहे. पण, ‘त्यांच्या’ विश्वात दिवाळीची लगबग आतापासूनच सुरू झालेय. जमेल ते योगदान दिवाळीच्या काळात शाळेसाठी द्यायचं आणि आपली कलाही सादर करायची, या दुहेरी हेतूनं ही चिमुकली मंडळी झटतायत.
खरंतर कुणाला बोलता येत नाही तर कुणाला ऐकू येत नाही. पण, तरीही ही मुलं एकोप्याने दिवाळीच्या तयारीला लागली आहेत. कुणी ग्रिटिंग्ज तयार करतंय, कुणी पणत्या, कुणी आकाशकंदील तर कुणी किल्ला बनवण्यासाठी लागणारे सैनिक! कै. केशव परशुराम अभ्यंकर मूक बधिर विद्यालयातील मुला-मुलींनी तयार केलेल्या पणत्या पाहिल्या तर त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन झटक्यात बदलून टाकतील, एवढ्या मनमोहक आहेत. पणत्या तयार करताना लागणारे कष्ट आणि कलेचा लागणारा कस या दोन्ही कसोटीला तंतोतंत उतरून ही मुलं शाळेत रमली आहेत. काहीजणं अगदी उटणं तयार करण्याचं कामही करत आहेत. कुणाची कला ग्रिटिंग्जसाठीही बहरत आहे. विविध शुभेच्छांशी आणि वळणदार अक्षरांनी बहरलेली ही शुभेच्छापत्र अगदी कुणाच्याही भावनांना साद घालतील, अशीच आहेत. तसंच किल्ल्यावरील सैनिकही. विविध आकारांतील, विविध रंगाचे आणि विविध उंचीचे सैनिक बालगोपाळांच्या किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी या शाळेत सज्ज झाले आहेत. त्याच्या जोडीला तुळशीवृंदावनही आहेत. एकूणच शाळेतील विद्यार्थी आता दिवाळीच्या स्वागताला जोमाने कामाला लागले आहेत. त्यांच्या कलेचा सुगंध बाजारपेठेतील उटण्यापेक्षाही जास्त दरवळत राहील, यात शंका नाही. (प्रतिनिधी)