खारेपाटण : संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे शुक नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावात पूरस्थिती निर्माण झाली. खाडीलगतच्या गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.खारेपाटण येथील शुक नदीचे पुराचे पाणी शहरात शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज, मंगळवारी सकाळपासून खारेपाटण रोड रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने तेथील वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. सरपंच प्राची ईसवलकर यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.पुरामुळे सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना घरी पाठविण्यात आले आहे. खारेपाटण एसटी बस स्थानकाकडे येणारा मुख्य रस्ता देखील पाण्याखाली जाणार असल्याने सर्व वाहतूक बंद करून प्रवाशांना सूचना देण्यात आल्या आहेत. बाजारपेठेतील व्यापारी वर्गाने खबरदारीचा उपाय म्हणून आपले सामान इतरत्र हलविण्यासाठी सुरवात केली आहे. पावसाची संततधार काय राहिल्यास ऐन गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर दुकानात भरलेल्या सामानाचे नुकसान होणार असल्याने व्यापारी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.मच्छी मार्केट परिसरात पाणी गेले आहे. बाजारपेठ ते श्री देव कालभैरव मंदिराकडे जाणार रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. तसेच घोडेपाथर बंदर येथे पुराचे पाणी आले असून बंदरवाडीकडे जाणारा रस्ता बंद होण्याची शक्यता आहे. प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
Sindhudurg: शुक नदीने ओलांडली धोक्याची पातळी; खारेपाटणमध्ये पूरस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 13:58 IST