झुकलेला गड शिवसेनेने अखेर राखलाच!

By Admin | Updated: October 19, 2014 22:59 IST2014-10-19T22:32:08+5:302014-10-19T22:59:05+5:30

राष्ट्रवादीचे शेखर निकम यांनी सर्वच आघाड्यांवर चुरशीची झुंज देत लढाई लढली असतानाही

Shivsena tilted the fort! | झुकलेला गड शिवसेनेने अखेर राखलाच!

झुकलेला गड शिवसेनेने अखेर राखलाच!

सुभाष कदम - चिपळूण --एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा चिपळूण मतदारसंघ १९९० पासून शिवसेनेकडे झुकला. आज (रविवारी) झालेल्या मतमोजणीत राष्ट्रवादीचे शेखर निकम यांनी सर्वच आघाड्यांवर चुरशीची झुंज देत लढाई लढली असतानाही शिवसेनेचे आमदार सदानंद चव्हाण यांनी आपला गड कायम राखला.
चिपळूण विधानसभा मतदार संघात झालेली ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती. राष्ट्रवादी काँग्रेसने शेखर निकम या स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराला रिंगणात उतरवून मोठे आव्हान निर्माण केले होते. निकम यांचा या मतदार संघात बोलबाला आहे. विविध माध्यमातून त्यांनी कामे केली आहेत. निगर्वी, साध्या सरळ मनाचे निकम हे अजातशत्रू होते. एरव्ही दिसणारे राष्ट्रवादीचे दोन गट त्यांच्या निवडणुकीत दिसले नाहीत. राष्ट्रवादीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले. तरीही अंतिम विजय आमदार सदानंद चव्हाण यांनी खेचून आणला. आमदार चव्हाण यांनी गेली ५ वर्षे या मतदार संघाशी आपली नाळ घट्ट जोडली. एक शांत, संयमी कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती.
मतदार संघात त्यांनी केलेली विकासकामे त्यांना आज फायद्याची ठरली. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारबद्दल जनमानसात रोष आहे. राष्ट्रवादीचे मंत्री सर्वाधिक भ्रष्टाचारी आहेत. यामुळे राष्ट्रवादीची प्रतिमा मलीन झाली होती. तरी शेखर निकम यांच्यासारख्या स्वच्छ चेहऱ्याच्या उमेदवाराला राष्ट्रवादीने चव्हाण यांच्यासमोर उभे केले. निकम हे चव्हाण यांचे नातेवाईक आहेत. मात्र, राजकारणात कोणी कुणाचे नसते, याचा प्रत्यय याहीवेळी आला. चिपळुणातील तुल्यबळ निवडणुकीत सदानंद चव्हाण यांनी पुन्हा बाजी मारली.
आमदार सदानंद चव्हाण यांनी आपण केलेल्या विकासकामांवर अधिक भर देत मतदार संघातील कामांवर लक्ष केंद्रीत केले. राष्ट्रवादीचे निकम यांनी विविध माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा शासकीय फंड आणला होता. अनेक कामे त्यांनी मार्गी लावली होती. आपल्या परीने मतदार संघात त्यांनी सर्वच प्रकारे मेहनत घेतली होती. परंतु, लोकशाहीत मतदार राजा हा सर्व काही असतो. त्याच्या मतानुसार सर्व चालते. निकम यांनी विविध घटकांना हाताशी धरुन सर्वच पातळ्यांवर एक मोठे आव्हान निर्माण केले होते. परंतु, चव्हाण यांनी कोणताही आकांडतांडव न करता हा हल्ला शांतपणे परतावून लावला. चव्हाण यांनी चिपळूणपेक्षा संगमेश्वरवर आपली भिस्त जास्त ठेवली. त्यासाठी त्यांनी सातत्याने संगमेश्वरशी संपर्क ठेवला. त्याचा त्यांना या निवडणुकीत फायदा झाला.
चव्हाणांबाबत मतदारसंघात मुळात नाराजी नव्हती. किरकोळ कामावरुन जे काही लोक दुखावले होते, त्यांच्याबाबत आवश्यक ती उपाययोजना चव्हाण यांनी केली होती. चिपळूण तालुक्यात असलेल्या राष्ट्रवादीच्या प्राबल्याचा विचार करता शेखर निकम यांना चिपळूणमध्ये अधिक मताधिक्य मिळेल. हे हेरून चव्हाण यांनी ते मताधिक्य कमी करण्यासाठी संगमेश्वरकडे मोर्चा वळविला.
चिपळूण तालुक्यातील आमदार भास्कर जाधव २००४मध्ये शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरही वाऱ्यावर असणाऱ्या शिवसेनेने आपले पाय आता अधिक घट्ट रोवले आहेत. ग्रामीण भागातील शिवसैनिक आजही कडवटपणे काम करतो. त्यामुळे सेनेच्या मतात फारशी घट जाणवली नाही. आमदार चव्हाण यांचे मताधिक्य कमी झाल्याची अनेक कारणे आहेत. त्यातील पहिले कारण राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर निकम हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला निकम यांच्यासारखा तगडा उमेदवार मिळाला होता. परंतु, त्यांना निवडून आणण्यात पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांचे प्रयत्न अपुरे पडले. चिपळूण शहर व खेर्डी हे राष्ट्रवादीचे बालेकिल्ले समजले जातात. येथे किमान तीन ते साडेतीन हजाराचे मताधिक्य मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, चिपळूण शहरात १२८७ व खेर्डीमध्ये निकम यांना केवळ ४१५ मतांची आघाडी मिळाली. संपूर्ण चिपळूण तालुक्यात किमान १० हजाराची आघाडी अपेक्षित असताना जेमतेम अडीच हजारांची आघाडी निकम यांच्या हाती आली, तेव्हाच आपला पराभव होणार हे त्यांनी मान्य केले. चव्हाण व निकम नातेवाईक आहेत. शिवाय ही लढतही तुल्यबळ झाली.
शिवसैनिकांनी घेतलेल्या अपार कष्टाचे चीज झाले. मात्र, राष्ट्रवादी काँगे्रसची संधी हुकली. राष्ट्रवादी काँग्रेसकडे आता निकम यांच्यासारखा तगडा उमेदवार नाही किंवा नवीन उमेदवार निवडून येण्याची शक्यताही नाही. या निवडणुकीत माजी आमदार रमेश कदम व माजी पालकमंत्री रवींद्र माने यांचाही प्रभाव जाणवला नाही. काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले सुभाष बने यांचा सेनेला काही प्रमाणात फायदा झाला. शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न साकार करण्यासाठी इरेला पेटले होते. त्यामुळे चव्हाण यांचा विजय अधिक सोपा झाला.
चिपळूण मतदार संघात चव्हाण किंवा निकम हे दोघेही तुल्यबळ उमेदवार होते. दोघेही स्वभावाने साधे, सरळ, शांत व संयमी आहेत. त्यामुळे कोणीही निवडून आला तरी चिपळूणकरांना आनंदच झाला असता. या निवडणुकीतील पराभव हा राष्ट्रवादी काँग्रेसला आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. कारण हा पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागणारा आहे. मुळात निकम यांना पक्षाध्यक्ष शरद पवार व अजित पवार यांचा पाठिंबा होता. त्यांच्या आग्रहास्तव निकम रिंगणात होते. परंतु, त्याला यश मिळाले नाही. निकम यांनी सर्व ताकद पणाली लावून कडवी झुंज दिली. पण यशाने त्यांना हुलकावणीच दिली. या मतदार संघात भाजपाची मतेही निर्णायक ठरली.
भाजपाचे गवळी यांना ९,१४३ मते मिळाली, तर काँग्रेसच्या रश्मी कदम यांना ३७०२ मते मिळाली. निकम यांना विजय सहज सोपा व्हावा, यासाठी देवरुखमध्ये काही उमेदवार उभे करण्यात आले. परंतु, हे उमेदवार आपली अनामतही वाचवू शकले नाहीत. त्यामुळे त्याचा परिणाम चव्हाण यांच्यावर झाला नाही.
चिपळूण व संगमेश्वरमध्ये शिवसेना आजही मजबूत स्थितीत आहे. याचा प्रत्यय पुन्हा एकदा या निवडणुकीत आला. शिवाय आमदार सदानंद चव्हाण यांनी घेतलेली मेहनत, केलेली विकासकामे त्यांच्यासाठी जमेच्या बाजू ठरल्या आहेत. भविष्यात राष्ट्रवादीला हा मतदार संघ जिंकायचा झाल्यास आतापासूनच काम करावे लागेल. अन्यथा राष्ट्रवादीसाठी ही धोक्याची घंटा आहे. राष्ट्रवादीला आता पुन्हा नव्याने मतदारसंघात काम करावे लागणार आहे.
विजयानंतरचा जल्लोष... चिपळूण विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर सदानंद चव्हाण यांना कार्यकर्त्यांनी उचलून घेतले.

Web Title: Shivsena tilted the fort!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.