लांजात शिवसेना सत्तेतून बाहेर !-- ‘लोकमत’चे वृत्त ठरले खरे
By Admin | Updated: January 29, 2015 00:14 IST2015-01-28T23:28:47+5:302015-01-29T00:14:23+5:30
नगरपंचायत : राष्ट्रवादी, भाजपसह तीन अपक्ष सत्तेसाठी आले एकत्र

लांजात शिवसेना सत्तेतून बाहेर !-- ‘लोकमत’चे वृत्त ठरले खरे
रत्नागिरी : गेल्या चार दिवसांतील जोरदार घडामोडीनंतर लांजा नगरपंचायतीत राष्ट्रवादी, भाजप व तीन अपक्ष यांची सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या तिन्ही घटकांनी नऊ संख्याबळाची जुळणी करीत लांजा नगरपंचायतीत सत्ता स्थापनेचा दावा काल, मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केला आहे. या घडामोडींमुळे लांजा नगरपंचायतीत शिवसेना सत्तेबाहेर जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या मानसी संदीप डाफळे व तनिशा राजेंद्र कांबळे, राष्ट्रवादीचे दिलीप मुजावर, तृप्ती वाघधरे, संपदा वाघधरे व परवेझ घारे, तसेच अपक्ष मदन राड्ये, सुगंधा सुभाष कुंभार व मनोहर कौचे या नऊजणांचा सत्ता स्थापनेसाठी झालेल्या आघाडीत समावेश आहे. गेल्या चार दिवसांपासून या आघाडीसाठी राष्ट्रवादी व भाजपच्या नेत्यांनी जोरदार प्रयत्न केले. त्यातूनच ही आघाडी उदयास आली असून, शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना यश आल्याची चर्चा सुरू झाली आहे.
याआधी लांजा ग्रामपंचायत असताना कॉँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र, गेल्या काही वर्षांत वेगवान राजकीय घडामोडीनंतर लांजा-राजापूर हा भाग शिवसेनेने आपला बालेकिल्ला बनविला. त्यामुळे लांजा नगरपंचायत निवडणुकीत त्याचे प्रतिबिंब दिसेल, असा राजकीय अंदाज व्यक्त झाला होता. मात्र, सर्व अंदाज चुकवित अपक्षांनी प्रथम क्रमांकाच्या जागा पटकावित त्यांच्याशिवाय कोणालाही सत्ता शक्य नसल्याचे दाखवून दिले होते.
लांजा नगरपंचायतीत पक्षीय पातळीवर विचार करायचा झाला तर शिवसेनेला १७ पैकी सर्वाधिक पाच जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीला चार, तर भाजपला दोन जागांवर विजय मिळाला. सहा जागा अपक्षांनी पटकावल्या. त्यामुळे अपक्षांना गळाला लावण्यासाठी राजकीय पक्षनेत्यांच्या हालचाली गेल्या चार दिवसांत सुरू झाल्या होत्या.
शिवसेनेला चार अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापनेची संधी होती. तसेच भाजपला बरोबर घेण्याचीही शिवसेनेची तयारी होती. मात्र, भाजपकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यावेळीच राष्ट्रवादी व भाजप यांची सत्ता स्थापन करून शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्याचे डावपेच दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी आखले. त्यानुसार तीन अपक्षांना बरोबर घेण्यात या दोन्ही पक्षांना यश आले आहे. (प्रतिनिधी)
नगराध्यक्षपद आलटून पालटून?
लांजा नगरपंचायतीत पक्षीय बलानुसार राष्ट्रवादीला प्रथम नगराध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर भाजप किंवा अपक्षांपैकी एकाला नगराध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. पाच वर्षांतील नगराध्यक्षपद व उपनगराध्यक्षपदाचे
वाटपही ठरविण्यात आल्याची चर्चा
राजकीय वर्तुळात आहे.
‘लोकमत’चे वृत्त ठरले खरे
लांजा नगरपंचायतीत शिवसेना-भाजप एकत्र येणार असल्याची चर्चा सुरुवातीपासूनच जोरात होती. मात्र, सेनेला सत्तेबाहेर ठेवणार असल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले अन् राजकीय वर्तुळात खळबळ माजली. हे वृत्त खरे ठरले आहे.