सिंधुदुर्गला पर्यटन ओळख शिवसेनेनेच दिली
By Admin | Updated: December 25, 2015 23:59 IST2015-12-25T22:51:47+5:302015-12-25T23:59:11+5:30
शंकर कांबळी : सावंतवाडी पर्यटन महोत्सवाचे केले कौतुक

सिंधुदुर्गला पर्यटन ओळख शिवसेनेनेच दिली
सावंतवाडी : सावंतवाडी पर्यटन महोत्सवातून जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळत असून, पर्यटन जिल्हा म्हणून खरी ओळख शिवसेनेनेच जिल्ह्याला दिली आहे, असे उद्गार माजी आमदार शंकर कांबळी यांनी काढले. ते सावंतवाडी पर्यटन महोत्सवात दुसऱ्या दिवशीच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी माजी आमदार राजन तेली, वेंगुर्ले नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल आदींनी उपस्थित राहत पर्यटन महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी माजी आमदार शंकर कांबळी म्हणाले, सावंतवाडी नगरपालिकेने शहराला एक पर्यटनाचा वारसा दिला आहे. गेली ११ वर्षे पर्यटन महोत्सव आयोजित करणे शक्य नाही. पण ते पालिका करीत आहे. या जिल्ह्याची पर्यटन जिल्हा म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी घोषणा केली आहे. त्यानंतर हा जिल्हा नेहमीच विकासाच्या प्रतिक्षेत राहिला. मात्र, आता पुन्हा एकदा जिल्ह्याचा विकास होत असल्याचे त्यांनी सांगितले. माजी आमदार राजन तेली यांनी नगरपालिकेने आपले सातत्य नेहमी ठेवून महोत्सव साजरा केला. सावंतवाडी आधी सुंदर होतीच. मात्र, नगरपालिकेने दर्जेदार प्रकल्प राबवत आणखी सुंदर केली. त्यामुळे पालिकेला भविष्यातही लागणारी सर्व मदत केली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. वेंगुर्ले नगराध्यक्ष प्रसन्न कुबल यांनी सावंतवाडीप्रमाणेच वेंगुर्लेमध्येही जानेवारी किंवा फेबु्रवारीमध्ये हा महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी कुबल यांनी केली. यावेळी नगरसेविका स्रेहा कुबल, शर्वरी धारगळकर, अनारोजीन लोबो, अफरोझ राजगुरू उपस्थित होते. (प्रतिनिधी)
भक्ती संगीताबरोबरच नाट्यसंगीताची मेजवानी
सावंतवाडी पर्यटन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी प्रख्यात गायिका साधना घैसास व सारेगम फेम नचिकेत देसाई या दोघांनी भक्तीसंंगीत व नाट्यसंगीताच्या तालावर श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. भक्तीसंगीतात दत्ता दिगंबरा दिगंबरा..., तर विविध नाट्यसंगीत सादर केली. यावेळी प्रख्यात तबलावादक साई बँकर यांनी कार्यक्रमात चांगलीच जान भरली. त्याचे श्रोत्यांनी चांगलेच कौतुक केले. तर सावंतवाडीतील नीलेश मेस्त्री यांनी हार्माेनियमची सुंदर साथ यावेळी दोघांनाही दिली. निवेदक शित्रे यांनी पं. जितेंद्र अभिषेकी यांची आठवण करून दिली. त्यांनी सावंतवाडीतील रसिकांनी आतापर्यंत कला जिवंत ठेवल्याची सांगितले होते. तशी कला आजही जिवंत असल्याचा प्रत्यय या कार्यक्रमातून आल्याचे त्यांनी सांगितले.