कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुठला मोठा पक्ष असेल तर तो आमदार दीपक केसरकर व आमदार नीलेश राणे यांचा शिंदेसेना आहे, असे प्रतिपादन उद्योगमंत्रीउदय सामंत यांनी कुडाळ येथील आभार मेळाव्यात गुरुवारी रात्री केले. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र फाटक, आमदार नीलेश राणे, आमदार किरण सामंत, प्रवक्त्या ज्योती वाघमारे, बाळा चिंदरकर, संजय आंग्रे, दत्ता सामंत, आनंद शिरवलकर, संजू परब, वर्षा कुडाळकर, ॲड. नीता कवीटकर, संजय पडते तसेच इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उदय सामंत यांनी सांगितले की, काही संबंध नसताना काही गोष्टी घडवायच्या. एखादी दुर्घटना घडल्यानंतर एखादी गोष्ट घडल्यानंतर त्याला थेट नीलेश राणेंचा संबंध जोडायचा, हे राजकारण कार्यकर्ते थांबवण्यासाठी जर कोण करत असतील तर आज या सभेला तुम्ही उत्तर दिलेला आहे. एमआयडीसी तून ५० कोटींचा निधी नीलेश राणे यांना देणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.ज्योती वाघमारे, संजय पडते, अपूर्वा सामंत, बाळा चिंदरकर, दीपलक्ष्मी पडते, अशोक दळवी, दादा साईल, प्रेमानंद देसाई यांनीदेखील आपले मनोगत व्यक्त केले. उबाठा सेनेतून सुमारे दीड हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी विविध गीत सादर करण्यात आली. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांचे कार्य अधोरेखित करणारे व्हिडिओ दाखवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजा सामंत यांनी केले.
मला पराभूत करण्यासाठी २५ वर्षे वाट पाहानीलेश राणे म्हणाले, पाच महिने आम्ही इथे ठिकाणी मेहनत घेतली, जे काय कष्ट घेतले, पक्ष उभा केला. गावागावामध्ये इतर सगळे पक्ष बिथरले की हा कुठला पक्ष लोक बांधतायत? हा जर पक्ष बांधला गेला तर इतर कुठल्या पक्षाला संधी मिळणार नाही. असा पक्ष आम्ही इकडे उभा केला. तुम्हाला आज या व्यासपीठावरून विश्वास देतो. विरोधक माझ्यावर टीका करतात. पण मला इकडे परत पराभूत करण्यासाठी २५ वर्ष तुम्हाला वाट बघावी लागेल. तुम्हाला मी लोकप्रतिनिधी व्हायला देणार नाही. या जिल्ह्यातून तरी होणार नाही. कुठून तरी आयात करून काय जर आणलं तर मला माहीत नाही. पण या जिल्ह्यातून निवडून याल अशी परिस्थिती ठेवणार नाही एवढे विरोधकांनी लक्षात ठेवावे.
घरी बसेन, पण शिंदेंना सोडणार नाहीकाही लोक म्हणतात नीलेश राणे आता दुसऱ्या पक्षात जाणार. आयुष्यात कधी जाणार नाही. ज्या शिंदे साहेबांनी या कपाळाला गुलाल लावला, दहा वर्षांच्या काळानंतर कपाळाला गुलाल लागला नव्हता, ते शिंदे साहेबांनी लावला हे उपकार त्यांचा मी कधी आयुष्यात विसरणार नाही. कशाला जाऊ मी दुसरीकडे? अरे घरी बसेन, पण माझ्या शिंदे साहेबांना सोडणार नाही. मी या सरकारमध्ये दुसरा कोणालाच फोन लावत नाही. मी फक्त उदय सामंतांना फोन लावतो. बाकी कोणाला फोन लावत नाही. कधी कोणाकडे जात नाही. मदत मागितली तर या माणसाकडे मागतो. काय विचारायचं झालं तर या माणसाला विचारतो. दुसरा कोणाकडे जात नाही. कधी जायची गरजच पडली नाही. म्हणून सामंत असेच प्रेम आमच्यावर ठेवा. आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर ठेवा.
नीलेश राणेंना मंत्रिपद द्यावे : दत्ता सामंतदत्ता सामंत म्हणाले, येथील जनतेचा आशीर्वाद आमदार नीलेश राणे यांच्या पाठीशी कायमचा राहिला पाहिजे. कारण महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्यांमध्ये कुठल्याही तालुक्यामध्ये नीलेश राणे गेले तर हजारो संख्येच्या माध्यमातून कुठल्याही जिल्ह्यामध्ये सभा घेऊ शकतात. अशी ताकद मुंबई ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. एक दमदार असा कार्यकर्ता शिंदेसेनेला मिळालेला आहे. शिंदेसेना ही एक नंबर करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. शिंदेसेना भक्कम करण्यासाठी नीलेश राणे यांना मंत्रिपद द्यावे, अशी मागणी दत्ता सामंत यांनी केले. त्यांना मंत्रिपद मिळाले तर २०२९ च्या निवडणुकीत शिंदेसेनेला अजून यश मिळेल, असा विश्वास दत्ता सामंत यांनी व्यक्त केला.