‘ती’ शिला पर्यटकांचे आकर्षण
By Admin | Updated: March 4, 2015 23:41 IST2015-03-04T21:25:54+5:302015-03-04T23:41:44+5:30
ओटवणे सीमेवरील नानी डोंगर : शिलेची उंची वाढत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे$$्निंमहेश चव्हाण ल्ल ओटवणे

‘ती’ शिला पर्यटकांचे आकर्षण
चराठे-ओटवणे सीमेवरील नानी डोंगर भागातील शिला पर्यटक आणि ग्रामस्थांसह पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. विशेष म्हणजे, या शिलेची उंची काळागणिक वाढत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून, तिला पाहण्यासाठी गर्दी होत आहे. चराठे सीमेरेषेवरील मसूरकर यांच्या काजू बागेनजीक रस्त्याच्या कडेला लागून असलेली ही शिला विलक्षण स्वरूपाची आहे. जवळजवळ १२ ते १३ फूट उंच, जाडी केवळ पाच ते सहा सेंटीमीटर आणि रुंदी पाच फुटी अशी अभूतपूर्व रचना या शिलेची आहे. अशी ही आश्चर्यकारक रचनेची शिला ग्रामस्थ आणि पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. ओटवणे-चराठे गाव हे सावंतवाडी राजेशाही संस्थानकालीन असून, पांडवकालीन दैवी पदस्पर्शाने पावन झालेले गाव आहे. त्यामुळे अशा शिला म्हणजे गतकाळातील धार्मिक तथा ऐतिहासिक परिस्थितीच्या प्रतिकृती समजल्या जातात. त्यामुळे ही शिला त्या काळची बैठकीची जागा अथवा एखादी नियोजित खूण असल्याचे भासते.
ग्रामस्थांसह पर्यटकांची गर्दी
पातळ पापुद्र्याप्रमाणे भासणारी ही शिला गेली कित्येक वर्षे वाऱ्या-पावसाच्या माऱ्यातही भक्कम स्थितीत उभी आहे. तसेच शिलेची उंची काळागणिक वाढत असल्याचे जाणकार लोक सांगतात. काही वर्षांपूर्वी काही फूट उंची असलेल्या या शिलेची उंची आता तब्बल बारा-तेरा फुटांपर्यंत वाढली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वाढत्या उंचीच्या या शिलेला पाहण्यासाठी ग्रामस्थांसह पर्यटकांची गर्दी होत आहे.