शरीफाच्या वाटेकडे अजूनही लागले आहेत साऱ्यांचे डोळे...
By Admin | Updated: January 5, 2015 23:18 IST2015-01-05T22:55:07+5:302015-01-05T23:18:53+5:30
शरीफा परत येईल, याकडे तिची आई आणि भावंडाचे डोळे लावून बसली आहे.

शरीफाच्या वाटेकडे अजूनही लागले आहेत साऱ्यांचे डोळे...
मेहरुन नाकाडे - रत्नागिरी -‘बेटा आज स्कूल में मत जाओ... हमारे साथ रहो...’ असे आर्जव आजी अजिजा करीत असतानाही शाळेची ओढ असल्याने शरीफा नियमित सवयीनुसार आवरून शाळेत गेली. मात्र, सायंकाळी नेहमीप्रमाणे शरीफा शाळेतून घरी आलीच नाही. आई-वडील वाट पाहात होते. शरीफाचा अपघात झाला आहे, असा फोन वडिलांच्या मोबाईलवर आला आणि तिचे आई-वडील कोसळलेच. अजूनही ते व शरीफाची भावंडे धक्क्यातून सावरलेली नाहीत. शरीफा परत येईल, याकडे तिची आई आणि भावंडाचे डोळे लावून बसली आहे.
रत्नागिरी शहरापासून जवळच असलेल्या मजगाव गावातील ताजुद्दिन युसूफ मुकादम व नसीमा ताजुद्दिन मुकादम हे मध्यमवर्गीय कुटुंब. ताजुद्दिन यांचे छोटेसे दुकान असून, त्यावर त्यांच्या कुटुंबांची गुजराण सुरू आहे. ताजुद्दिन यांना चार मुली. स्वत:ला शिक्षण घेता आले नाही. परंतु मुलींना उच्च शिक्षित करायचे, हे दाम्पत्याने स्वप्न बाळगले होते. त्यानुसार त्यांनी मोठी मुलगी आस्मा हिचे पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लग्न करून दिले. दोन नंबरची मुलगी आलिया महाविद्यालयीन शिक्षण घेत असून, तीन नंबरची मुलगी सारा यावर्षी दहावीला आहे. सर्वांत धाकटी शरीफा आठवी इयतेत शिकत होती.
नसीमा यांचे माहेर जवळच असल्याने शरीफा व तिच्या बहिणीचे आजोळी नियमित जाणे-येणे असे. आजी अजिजा आजारी असल्याने आजीचा ओढा तिला अधिक होता. शाळेतून आल्यानंतर शरीफा आजीकडे जाऊन बसत असे. तिला आपल्या छोट्या हाताने खाऊ-पिऊ घालण्याबरोबर छान गप्पागोष्टीही मारत असे. त्यामुळे आजीही शरीफाची नित्य वाट पाहात असे.
दि. २ जानेवारी रोजी सकाळी शरीफा शाळेत गेली. सायंकाळी शाळा सुटल्यानंतर शरीफा मैत्रिणींबरोबर बाहेर पडली. आईने दिलेले दहा रूपये घेऊन शरीफाने शाळेजवळील दुकानातून दोन रूपयांचा खाऊ खरेदी केला. खाऊ घेऊन उर्वरित पैसे लवकर द्या, मला बसला जायचे आहे, असे सांगून शरीफा बस पकडण्यासाठी मैत्रिणींसमवेत निघाली. बस पकडण्याची घाई तिचा जणू काळच बनून आला होता. काही वेळातच एस. टी. अपघातात शरीफाचा मृत्यू झाला.
शरीफाच्या अपघाती मृत्यूचे वृत्त शहरात नव्हे; तर मजगाव गावात कळले. शरीफाच्या वडिलांना अपघात झाल्याचे कळविण्यात आले. आई-वडील दोघेही रत्नागिरीत दाखल झाले. अपघातस्थळी असलेली गर्दी पाहूनच दोघेही कोलमडली.
शरीफाचे आई - वडील आजही मानसिक धक्क्यातून सावरलेले नाहीत. त्यांना अद्याप आपली मुलगी घरी येईल, असेच वाटत आहे. शरीफाची मोठी बहीण परदेशातून गावी आली आहे.
तिन्ही बहिणींना आपल्या लाडक्या छोट्या बहिणीच्या मृत्यूचे दु:ख पचवणे अवघड आहे. अतिशय गोड, लाजाळू, शांत स्वभावाची शरीफाची अभ्यासातील प्रगतीही उत्तम होती. त्यामुळे शाळेच्या मैत्रिणींनाही शरीफाचा विरह जाणवत आहे. शिक्षकवृंद, वर्गशिक्षक यांनाही शरीफाच्या जाण्याने दु:ख झाले आहे.
1शरीफाला झालेल्या अपघाताबाबत अजूनही नीट कुणालाच माहिती नाही. त्यामुळे अपघात कशा प्रकारे झाला? याबाबत कोडेच आहे.
2शरीफाला झालेला अपघात एवढा भीषण होता की, केवळ शरीफाचे आई-वडीलच नव्हे; तर उपस्थित हजारोंचा जमावच हेलावून गेला.
3शरीफाच्या अपघाती मृत्यूनंतर तिची परदेशी राहणारी बहीणही रत्नागिरीत दाखल झाली आहे. पण आज तिच्याशी बोलायला शरीफा नाही.
4छोट्या मुलीचा असा मृत्यू व्हावा, ही कल्पनाच अंगावर शहारे आणणारी होती. त्यामुळे तिच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी रिघ लागली आहे.