वेंगुर्ले फळ संशोधन केंद्रात आंबा, काजू पिकावर नवनवीन संशोधन; शरद पवार यांनी घेतली माहिती
By अनंत खं.जाधव | Updated: April 24, 2025 18:03 IST2025-04-24T18:01:50+5:302025-04-24T18:03:53+5:30
वेगुर्ले : माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी आज, गुरूवारी वेंगुर्ले येथील फळ संशोधन केंद्राला भेट दिली. यावेळी ...

वेंगुर्ले फळ संशोधन केंद्रात आंबा, काजू पिकावर नवनवीन संशोधन; शरद पवार यांनी घेतली माहिती
वेगुर्ले : माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी आज, गुरूवारी वेंगुर्ले येथील फळ संशोधन केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी फळ संशोधन केंद्रातील आंबा, काजू या पिकावर नवनवीन पध्दतीने करण्यात आलेल्या संशोधनाची माहिती घेतली. विशेष करून काजू पिकांचे उत्पादन वाढविण्यात कृषी यश आले असून त्याचे सादरीकरण ही यावेळी करण्यात आले. दापोली कृषी विद्यापिठाचे कुलगुरू संजय भावे यांनी कृषी केंद्रातील नवनवीन सशोधनाची माहिती दिली त्यावर पवार यांनी समाधान व्यक्त केले.
शरद पवार हे दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून त्यांनी आज वेंगुर्ले कृषी संशोधन केंद्राला भेट दिली. कुलगुरू संजय भावे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी उद्योगपती अवधूत तिबलो, अप्पर पोलीस अधीक्षक रूषिकेश रावले, जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डाॅन्टस, प्रांताधिकारी हेमंत निकम, माजी मंत्री प्रविण भोसले, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, आदिती पै प्रसाद रेगे, श्वेता कुबल आदिसह फळ संशोधन केंद्रातील प्राध्यापक उपस्थित होते.
कुलगुरू भावे यांनी फळ संशोधन केंद्राकडून कशा प्रकारे संशोधन सुरू आहे याबाबतची माहिती पवार यांना दिली. यात प्रामुख्याने काजू चे उत्पादन कशा प्रकारे वाढविण्यात आले. महाराष्ट्रात कशा प्रकारे काजूचे उत्पादन घेतले जाते. १९८७ साली अवघ्या २२ हजार हेक्टर वर असलेले काजूचे उत्पादन २०२३-२४ मध्ये ते तब्बल दोन लाख हेक्टर च्या घरात जाऊन पोहचले आहे. काजूच्या वेगवेगळ्या जाती विकसित करण्यात आल्याचे सांगितले.
तसेच काजू प्रमाणेच आंबा व भात शेतीच्या नवनवीन जाती विकसित करण्यात आल्या असून या सर्व प्रयोगाना चांगला प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती दिली. पवार यांनी सर्व पिकांचे सादरीकरण सुरू असतानाच भावे यांना वेगवेगळे प्रश्न विचारून त्याबद्दलची माहिती जाणून घेतली. पवार यांनी खासगी दौरा असतानाही त्यातून वेळ काढून आबा संशोधन केंद्राला भेट दिली तसेच प्रत्यक्षात केंद्रातील सर्व पिकांची माहिती जाणून घेतली.