वेंगुर्लेत जिवंत कासवांसह चंदनाची लाकडे जप्त, सात जण ताब्यात, सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 01:55 IST2018-08-11T01:55:12+5:302018-08-11T01:55:23+5:30

वेंगुर्लेत जिवंत कासवांसह चंदनाची लाकडे जप्त, सात जण ताब्यात, सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त
कुडाळ : वनविभागाच्या कुडाळ पथकाने वेंगुर्ले-म्हाडा कॉलनी येथील अजित गावडे यांच्या घरासह चार कातकऱ्यांच्या सहा झोपड्या व एका घरावर टाकलेल्या धाडीत अवैधरित्या जायबंदी करून ठेवलेल्या नऊ जिवंत कासवांसह चंदनाची लाकडे व इतर शिकारीचे साहित्य मिळून सुमारे ३ लाख २८ हजार ४०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सात जणांना ताब्यात घेतले आहे.
सावंतवाडी वनक्षेत्रपाल फिरत्या पथकाला वेंगुर्ले कॅम्प येथील अजित गावडे यांच्या घरात चंदन लपवून ठेवण्यात आले असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास कुडाळ वनक्षेत्रपाल विभागाच्या पथकाने गावडे यांच्या घरावर धाड टाकली. यावेळी घरात गोणीमध्ये सुमारे ४० हजार रुपये किंमतीच्या चदंनाच्या झाडाच्या साली मिळाल्या. या अवैध चंदन साठ्यासह वनविभागाने गावडे याला ताब्यात घेतले.
अधिक तपासात गावडे याला वेंगुर्ले कॅम्प येथील मयुर आंगचेकर, गणेश गिरी यांच्यासह कातकरी समाजातील सुरेश पवार, चंदू पवार, शिवाजी पवार, राजू पवार हे सर्वजण चंदन पुरवित असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. या माहितीनुसार वनविभागाने कातकरी समाजाच्या सहा झोपड्या व एका चिरेबंदी घरावर धाड टाकली. यात झोपड्यांमध्ये अवैधरित्या जायबंदी करून ठेवलेले नऊ जिवंत कासव, मृत कासवाच्या अवशेषाचे ७५ भाग, शिकारीसाठी वापरण्यात येणारे दोन तिरकामटे, बाण, कोयता, मोराची व लांडोराची पिसे, बॅटरी, खरवत, चंदनाची साले तसेच इतर साहित्य मिळून सुमारे २ लाख ८८ हजार ४०८ रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. या मुद्देमालाासह कातकरी समाजातील चारही जणांना वनविभागाने ताब्यात घेतले.
ही कारवाई सावंतवाडी उप-वनसंरक्षक समाधान चव्हाण, फिरते पथकाचे वनक्षेत्रपाल संजय कदम, कुडाळचे वनक्षेत्रपाल प्रदिप कोकीतकर, कडावल वनक्षेत्रपाल अमोल चिरमे, वनपाल मठ श्री. रा.गो.मडवळ, वनरक्षक तुळस श्री.सा..कांबळे, वनरक्षक वि. शे. नरळे, सुनिल सावंत, वनरक्षक सु. म.सावंत, जयश्री शेलार, प्रियांका पाटील, संतोष यादव, सचिन कांबळे , सारिक फकिर, सदानंद परब, निलम बामणे, अमृता नागरदळेकर, वनमजूर इत्यादी सहकार्य करत असून गुन्हयाचा तपास श्री.पी.जी.कोकीतकर वनक्षेत्रपाल कुडाळ करत आहेत.
जिवंत कासवाची मोठी किंमत
कातकरी समाजातील युवकांनी पकडून ठेवलेल्या कासवांची बाजारभावाप्रमाणे नऊ कासवांची सुमारे २ लाख ५० हजार रुपये असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या सर्व कासवांची पशु वैद्यकीय अधिकाºयांनी तपासणी केल्यानंतर त्यांना सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
आठ दिवसांत तीन कारवाया
कुडाळ वनविभागाने सध्या अवैधरित्या वृक्षतोड व शिकार तसेच प्राणी व त्यांच्या अवयवयांची तस्करी करणाºयांवर धाड टाकण्याचे सत्र सुरू केले आहे. गेल्या आठ दिवसात तीन कारवाई करून अनेक संशयित आरोपींना वनविभागाने गजाआड केले आहे.