वेंगुर्ले : चिपी विमानतळ सुरू होण्यासाठी आता कोणत्याही त्रुटी राहिल्या नसून, येत्या १२ सप्टेंबरला प्रायोगिक तत्त्वावर पहिले ‘टेक आॅफ’ करण्यात येईल. त्यानंतर माल्टा येथून पहिले आंतरराष्ट्रीय पातळीवरील विमान उतरले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी वेंगुर्ले येथील पत्रकार परिषदेत दिली.दोन दिवसांच्या वेंगुर्ले तालुका दौऱ्यादरम्यान पालकमंत्री केसरकर यांनी शनिवारी परुळे, भोगवे येथील पर्यटनक्षेत्रांना भेट दिली. तर रविवारी चिपी विमानतळ, फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले, आरवली व आरोंदा अशा पर्यटनक्षेत्रांना भेट दिली. त्यानंतर येथील सागर बंगला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी केसरकर यांनी केंद्रीय हवाईमंत्री सुरेश प्रभू, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार विनायक राऊत, मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस या सर्वांच्या सहकार्यामुळे चिपीमध्ये विमानतळ होण्याचे आपले स्वप्न पूर्ण होत आहे, असे सांगितले. विमानतळाचे सर्व काम पूर्ण झाले असून, लवकरच विमानसेवा सुरू होणार आहे. यासंदर्भात आपण आयआरबीला सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.माल्टावरून पहिले आंतरराष्ट्रीय पातळीवरील विमान उतरणार आहे. तसेच आठवड्यातून तीन दिवस आंतरराष्ट्रीय विमान उतरण्यासाठी एका कंपनीशी चर्चा झाली आहे. चिपी विमानतळाची धावपट्टी अडीच किलोमीटरची आहे व ती पुढे सव्वातीन किलोमीटर केली जाणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले.महिन्याभरात जिल्ह्यातील बारापैकी आठ कॉयर कारखाने सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा सधन जिल्हा होणार आहे. ‘जय जवान, जय किसान’ अंतर्गत आंबा, काजू, नारळ उत्पादक शेतकºयांना यांत्रिकी सुविधा पुरविण्यात येतील. सावंतवाडी येथे एमपीएससी, यूपीएससी अभ्यासक्रम सेंटर सुरू करण्यात येत आहे. ज्या युवकांना हॉटेल क्षेत्रात काम करायचे असेल अशांसाठी वेंगुर्ले व आंबोली येथे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. आपण ५० सीटच्या पाणबुडीची मागणी केली होती. मात्र, सध्या परदेशात २६ सीटची पाणबुडी तयार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत देशातील पहिलीच २६ सीटर पाणबुडी वेंगुर्ले येथे दाखल होईल, अशी माहिती त्यांनी दिली.पर्यटन, चिपी विमानतळ तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संपूर्ण किनारपट्टीवरील भागात विकासकामे केली जातील. मच्छिमारांसाठी ८०० पैकी ४०० बोटींना आऊटबोट इंजिन देण्यात येणार असून, पिंजºयातील मत्स्यशेती करणाºया गटांना ५० टक्के अनुदानावर कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मासळी बाहेर पाठविण्यासाठी वातानुकूलित वाहन देण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व बंदरांचे आधुनिकीकरण करणार असल्याचे पालकमंत्री केसरकर यांनी यावेळी सांगितले.लघुउद्योगासाठी कर्जयेत्या तीन महिन्यांच्या कालावधीत चिपी विमानतळ परिसरात ३०० ते ४०० कॉटेजीस उभे करण्यात येणार आहेत. येथील स्थानिकांच्या घराघरांमध्ये छोट्या स्वरूपाचे कॉटेज सुरू ंकरून त्याद्वारे स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी ज्या स्थानिकांच्या जमिनी विमानतळासाठी संपादित झालेल्या आहेत, त्यांनी पुढे यावे. त्यांना ५० टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती केसरकर यांनी दिली.
‘चिपी’वर १२ सप्टेंबरला विमानाचे ‘टेक आॅफ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:04 IST