मालवणात पर्यटकांसाठी साकारतोय सी वॉटर पार्क, स्थानिक पर्यटन व्यावसायिकांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 03:11 PM2017-11-18T15:11:03+5:302017-11-18T15:19:19+5:30

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पर्यटन क्षेत्रात जिल्ह्याला नावलौकिक मिळत गेला. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांसाठी रोजगाराची दालने उपलब्ध झाली. मालवण, तारकर्ली आणि देवबाग ही गाव पर्यटनाचे केंद्रबिंदू राहिली आहेत.

Sea Water Park, launched by tourists for the tourists in Malvan, is an initiative of local tourism professionals | मालवणात पर्यटकांसाठी साकारतोय सी वॉटर पार्क, स्थानिक पर्यटन व्यावसायिकांचा पुढाकार

मालवण - दांडी किनारी स्थानिक पर्यटन व्यावसायिक साकारत असलेल्या वॉटर पार्कचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे. (छाया : गणेश गावकर)

Next
ठळक मुद्देस्कुबा डायव्हिंग, जलक्रीडा प्रकारांना अनोखा पर्यायदांडी समुद्रकिनारी पार्कचे काम अंतिम टप्प्यात

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा जाहीर झाल्यानंतर खऱ्या  अर्थाने पर्यटन क्षेत्रात जिल्ह्याला नावलौकिक मिळत गेला. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांसाठी रोजगाराची दालने उपलब्ध झाली. मालवण, तारकर्ली आणि देवबाग ही गाव पर्यटनाचे केंद्रबिंदू राहिली आहेत.

स्थानिक व्यावसायिकांनी शासनाच्या मदतीचा हात न मागता स्वनिधीतून होडी सेवा, बोटिंग, स्कुबा डायव्हिंग यासह अनेक जलक्रीडा व्यवसाय सुरु केल्याने पर्यटक मालवणात रुळू लागला. वाढते पर्यटन व पर्यटकांना पर्यटनाचा आनंद अजूनही वेगळ्या पद्धतीने लुटता यावा, यासाठी स्थानिक युवा पर्यटन व्यावसायिकांनी मोट बांधत महत्वाकांक्षी सी वॉटर पार्क प्रकल्पाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.


मालवण दांडी किनारी सी वॉटर पार्क साकारत असून त्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या आठवडाभरात मालवणात किल्ले दर्शन व जलक्रीडाबरोबरच आणखीनच नयनरम्य असा वॉटर पार्क प्रकल्प पर्वणी ठरणार आहे. शिवाय ३५० वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या किल्ले सिंधुदुर्गच्या दर्शनी भागात हा प्रकल्प उभारला जात असल्याने आणखीनच महत्व वाढले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेषत: मालवण तालुक्याने पर्यटन क्षेत्रात क्रांती घडवत कात टाकली आहे. अनेक अडचणींचा सामना, त्यात शासनाकडून मिळणारे असहकार्य आदी समस्यांना फाटा देत येथील पर्यटन तसेच हॉटेल व्यावसायिक जिद्दीने पर्यटन क्षेत्रात उतरले आहे.

आज पर्यटनाची दिशा बदलत चालली आहे. वाढते पर्यटन आणि पर्यटकांच्या वाढत्या अपेक्षा पाहता येथील पर्यटन व्यावसायिक न डगमगता पर्यटन क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रकल्प आणत आहे. किनारपट्टी भागात चालणाºया मासेमारी व्यवसायाला पर्यटनाची साथ मिळाल्याने येथील शिक्षित युवा वर्ग नोकरीच्या मागे न धावता पर्यटनाकडे वळू लागला.

काही वर्षांपूर्वी पर्यटकांना केवळ किल्ले सिंधुदुर्ग दर्शन व समुद्रस्नान हे दोनच पर्याय होते. मात्र वाढत्या पर्यटनाबरोबर पर्यटनातील पर्यायांची व्याप्तीही वाढत गेली. आज किल्ले दर्शन, समुद्रस्नान, पॅरासिलिंग, स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, जलक्रीडा आदी पर्याय उपलब्ध आहेत. मात्र आता नव्याने पर्यटन क्षेत्रात पाय रोवणारा वॉटर पार्कचाही पर्याय पर्यटकांसाठी खुला असणार आहे.


मालवणातील पर्यटन व्यावसायिकांनी आपले पर्यटन व्यवसाय सांभाळून एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यातून वॉटर पार्क संकल्पना उदयाला आली. पर्यटकांना अनोख्या पद्धतीचे पर्यटन घडविण्याचे दृष्टीने तरुण व्यावसायिकांनी वॉटर पार्क सत्यात उतरवण्याचा मानस व्यक्त केला. त्यानुसार वॉटर पार्क प्रकल्पासाठी लागणारा निधी एकत्र करून जिल्ह्यातील पहिलाच प्रकल्प उभारण्यात येत आहे.

पर्यटकांसाठी आकर्षण

मालवणच्या पर्यटन व्यावसायिकांनी साकारलेला वॉटर पार्कला मोठी पसंती असून आकर्षणाचा विषय ठरत आहे. जागतिक पर्यटन स्थळांवर अशा प्रकारचे सुविधा असतात. त्यामुळे स्थानिक पातळीवर माफक दरात वॉटर पार्कचा पर्याय उपलब्ध झाल्याने पर्यटकांना वॉटर पार्कची ओढ लागली आहे. वॉटर पार्कचे युद्धपातळीवर काम सुरु असतानाही पर्यटक वॉटर पार्कमध्ये प्रवेशाची मागणी करत आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात काम पिरन झाल्यानंतर वॉटर पार्कची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे.

किल्ले सिंधुदुर्गच्या दर्शनी भागात आणि दांडी किनारी साकारत असलेला प्रकल्प पर्यटकांना नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.याबाबत पर्यटकांना सेवा व सुरक्षा घेण्याबाबत दांडी येथील श्री देव दांडेश्वर मंदिर येथे बैठक झाली. यात महत्वाचे निर्णय घेताना पर्यटकांच्या सुरक्षितेला सर्वाधिक प्राधान्य देण्याचे ठरविण्यात आले.

वॉटर पार्क दृष्टीक्षेपात

  1. जिल्ह्यातील पहिलाच सी वॉटर पार्क प्रकल्प
  2. किल्ले सिंधुदुर्गाच्या दर्शनी भागात पर्यटनाचा नवा पर्याय
  3. या प्रकल्पामुळे मासेमारी किंवा अन्य पर्यटन व्यवसायांना अडचण होणार नाही
  4. पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देवून जागा निश्चिती
  5. पर्यटकांसाठी लाईफ जॅकेटची सुविधा
  6. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जीवरक्षकांच्या नियुक्त्या

 

Web Title: Sea Water Park, launched by tourists for the tourists in Malvan, is an initiative of local tourism professionals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.