सावंतवाडी पालिका पोटनिवडणूक, भाजपमध्ये बंडखोरी अटळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 15:16 IST2019-12-07T15:14:40+5:302019-12-07T15:16:03+5:30
भाजपने अद्यापपर्यंत कोणालाही उमेदवारी जाहीर केलेली नसली तरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रभारी नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी उतरण्याचा निर्णय घेतल्याने भाजपमध्ये बंडखोरी अटळ मानली जात आहे. कोरगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल केला आहे. यामुळे पक्षात एकच खळबळ उडाली आहे. कोरगावकर यांनी अपक्ष व भाजप असे दोन अर्ज दाखल केले. हे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत खांडेकर यांच्याकडे दाखल केले आहेत.

सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीसाठी अन्नपूर्णा कोरगावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रसाद कोरगावकर, अखिलेश कोरगावकर, विराग मडकईकर उपस्थित होते.
सावंतवाडी : भाजपने अद्यापपर्यंत कोणालाही उमेदवारी जाहीर केलेली नसली तरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रभारी नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी उतरण्याचा निर्णय घेतल्याने भाजपमध्ये बंडखोरी अटळ मानली जात आहे. कोरगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल केला आहे. यामुळे पक्षात एकच खळबळ उडाली आहे. कोरगावकर यांनी अपक्ष व भाजप असे दोन अर्ज दाखल केले. हे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत खांडेकर यांच्याकडे दाखल केले आहेत.
यावेळी प्रसाद कोरगांवकर, अखिलेश कोरगावकर, ऐश्वर्या कोरगावकर, विराग मडकईकर, साक्षी कारिवडेकर, आनंद मिशाळ, संगीता वाडकर, सविता गव्हाणे, शिवम सावंत, रोहित पवार, रामचंद्र पवार, अलफाज मुल्ला, जयदीप बल्लाळ आदी उपस्थित होते.
बबन साळगावकर यांनी राजीनामा दिल्याने पोटनिवडणूक आहे. भाजपकडून सात ते आठ उमेदवारांनी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्याकडे अर्ज सादर केले आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची असलेली गर्दी पाहून जठार यांनी सावंतवाडी नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराचा विचार हा वरिष्ठ पातळीवर होईल, असे जाहीर केले आहे.
त्यामुळे इच्छुक उमेदवारांना आठ तारीखपर्यंत थांबावे लागणार आहे. त्यामुळेच अद्यापपर्यंत कोणीही अर्ज भरला नव्हता. मात्र सावंतवाडी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष व सध्याच्या प्रभारी नगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांनी पहिल्यापासूनच भाजपकडून किंवा अपक्ष असे निवडणूक रिंगणात उतरण्याची जाहीर केले होते. त्यामुळे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्याकडे दाखल केला.
पक्षाने आपल्या नावाचा विचार करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच पक्षाने उमेदवारी दिली नाही तरी मी अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार असेही कोरगावकर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. कोरगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजपनध्ये बंडखोरी अटळ झाली असून आता याचा निर्णय पक्षीयस्तरावर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र यापूर्वीही कोरगावकर यांनी नगरसेवकपदासाठी भाजपमधून अर्ज दाखल केला होता. मात्र, आयत्यावेळी त्यांच्या जागी दुसरा उमेदवार दिल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून त्या निवडून आल्या होत्या. तसेच मागील तीन वर्षाच्या सावंतवाडी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष म्हणून काम पाहत होत्या.