केसरकरांच्या मतदारसंघात साळगावकरांनी केलं आदित्य ठाकरेंचं स्वागत; शिवबंधनची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 21:41 IST2022-08-01T21:40:31+5:302022-08-01T21:41:19+5:30
आमदार दीपक केसरकर शिंदे गटात सामील झाल्यानंतर प्रथमच त्यांच्या मतदारसंघात निष्ठा यात्रेच्या निमित्ताने शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे सोमवारी आले होते.

केसरकरांच्या मतदारसंघात साळगावकरांनी केलं आदित्य ठाकरेंचं स्वागत; शिवबंधनची चर्चा
सावंतवाडी-
आमदार दीपक केसरकर शिंदे गटात सामील झाल्यानंतर प्रथमच त्यांच्या मतदारसंघात निष्ठा यात्रेच्या निमित्ताने शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे सोमवारी आले होते. यावेळी त्यांचे स्वागत जुन्या शिवसैनिकांनी केले. खास करून माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सावंतवाडीतील गवळीतिट्टा परिसरात केलेले स्वागत चर्चेचा विषय बनला आहे.
यावेळी माजी नगरसेवक विलास जाधव,उमेश कोरगावकर, सुरेश भोगटे,संजय नार्वेकर,बंटी माटेकर,शुभम मलकाचे,रवी जाधव आदिसह मोठ्याप्रमाणात शिवसैनिक तसेच साळगावकर यांचे सोबती उपस्थित होते. शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे प्रथमच सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते दुपारच्या सुमारास त्यांचे कुडाळ हून सावंतवाडी परिसरात आगमन झाले तेथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले त्यानंतर जुन्या शिवसैनिकांनीही ठाकरे यांचे स्वागत केले.
अनेक शिवसैनिक हे काम करण्याची इच्छा असतानाही आमदार केसरकर यांच्यापासून लांब होते त्यांनीही ठाकरे यांच्या दौऱ्यात सहभाग घेतल्याचे दिसून आले तर दुसरीकडे शिवसेनेतून वेगवेगळ्या पक्षात गेलेल्या काही जुन्या शिवसैनिकांना ही शिवसेने बद्दल प्रेम निमार्ण झाल्याचे दिसून आले.विशेषता सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर हे शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेले होते.पण आज शिवसेनेच्या पडत्या काळात ठाकरे यांची भेट घेत सावंतवाडीत स्वागत केल्याचे दिसून आले.
साळगावकर यांनी आदित्य ठाकरे यांचे स्वागत केल्याने सावंतवाडीत पुन्हा एकदा साळगावकर शिवसेनेत जाणार की काय अशी चर्चा रंगू लागली आहे मात्र त्यांनी आपण फक्त स्वागत केल्याचे सांगितले साळगावकर यांच्यासोबतच शिवसेनेतील अनेक जुन्या शिवसैनिकांनीही ठाकरे यांचे स्वागत केले.