शृंगारतळीच्या बाजारात बारमाही भाजीपाला विक्री

By Admin | Updated: June 1, 2015 00:14 IST2015-05-31T22:27:55+5:302015-06-01T00:14:50+5:30

राजेंद्र भंडारी : गुहागरातील एकमेव प्रगतशील शेतकरी

Sale to perennial vegetable in theater market | शृंगारतळीच्या बाजारात बारमाही भाजीपाला विक्री

शृंगारतळीच्या बाजारात बारमाही भाजीपाला विक्री

संकेत गोयथळे-गुहागर -तालुक्यातील गिमवी कोष्टेवाडी येथील राजेंद्र गंगाराम भंडारी यांनी बारमाही शेती व भाजीपाला लागवडीतून कुटुुंबाचा उदरनिर्वाह कसा होऊ शकतो याचा आदर्श सर्व शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. शृंगारतळी येथे होणाऱ्या आठवडा बाजारामध्ये बारमाही भाजीपाला विक्री करणारे ते तालुक्यातील एकमेव शेतकरी आहेत.
भंडारी यांची वडिलोपार्जीत साडेतीन एकर जागा आहे. आई-वडीलांबरोबर पारंपरिक भातशेती करताना शेती व्यवसायातच आवड निर्माण झाली. अन्य दोन भाऊ गाडी व्यवसायामध्ये आहेत. मात्र भंडारी यांनी पारंपरिक शेतीतून पुढे शास्त्रीयदृष्ट्या हंगामी नियोजन करुन बारमाही शेती कशी करावी याची कला मेहनतीने अवगत केली आहे. साडेतीन एकर जागेचे शेतीसाठी योग्य नियोजन करुन एक एकरमध्ये वर्षाला ३ टन कलिंगड उत्पादन, एक एकरमध्ये भाजीपाला लागवड व एक एकरमध्ये भातशेती केली जाते.यामध्येही भाजीपाला लागवड करताना थंडीमध्ये कलिंगडाबरोबरच मिरची, वांगी, कारली, चवळी आदी पिके तर एप्रिल, मे मध्ये भेंडी, काकडी व पडवळ आदी पिके घेतात. याकामी पत्नी, दोन मुलेही मेहनत करत असतात. त्यांचा एक मुलगा दहावी शिकत आहे तर मोठ्या मुलाने शेतीमध्ये विशेष आवड असल्याने पारंपरिक शेतीबरोबर आधुनिक शेती व्यवसायाचे प्रगत तंत्र अवगत व्हावे यासाठी अ‍ॅग्रीकल्चर डिप्लोमा करत आहे.नुसतेच बारमाही पीक घेऊन भंडारी थांबत नाहीत तर कुठल्याही नाशिवंत मालाला तात्काळ बाजारपेठ आवश्यक असते. हे लक्षात घेऊन शृंगारतळी येथील आठवडा बाजारात दरवेळी किमान दहा हजारांचा भाजीपाला ते विकतात. या बाजारात बहुतांशी भाजीपाला विकणारे हे बाहेर गावातून येतात. पण भंडारी या स्पर्धेत टिकून आपला व्यवसाय करताना दिसतात.अशा स्थितीत येथे बारमाही भाजीपाला विकणारे ते एकमेव शेतकरी आहेत. भाजीपाल्याबरोबरच ते गावठी बियाण्याची विक्री करतात. पावसाळ्यापूर्वी याला मोठी मागणी असते. त्यामुळे भंडारी यांनी या कामात विशेष लक्ष घातले आहे. अन्य शेतकरी शेतीबाबत अनास्था व्यक्त करत असताना दुसरीकडे भंडारी यांनी शेतीमध्ये आगळा प्रयोग केला आहे. नुसताच केला नाही तर तो यशस्वी करून दाखवला आहे.ज्या ठिकाणी भाजीपाला लागवड करतात तेथेच त्यांचे घर आहे. जागेमध्ये पाण्याच्या नियोजनासाठी स्वखर्चाने विहिर केली आहे. शासकीय योजनेतून २५ नारळ लावले आहेत. अशा पद्धतीने केवळ मेहनतीने शेती करुन वर्षभराचे नियोजन करुन बारमाही शेती करण्याचे तंत्र अन्य शेतकऱ्यांनी घेऊन केवळ नोकरीच्या पाठी न धावता स्वकर्तृत्वावर स्वतंत्रे अस्तित्व निर्माण केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया राजेंद्र भंडारी व्यक्त करतात.

Web Title: Sale to perennial vegetable in theater market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.