कणकवली : करूळ-गगनबावडा घाट मार्गाची दि. २८ डिसेंबरला महामार्ग प्राधिकरण व अन्य विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत एकत्रित पाहणी केली. त्याचवेळी रस्त्याचे काम दर्जेदार असले पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत सुरक्षेशी तडजोड होता कामा नये, ही आमची सर्वांची भूमिका होती. त्यानुसार माझ्याकडे संबंधित विभागाचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने तीन त्रुटी दर्शविण्यात आलेल्या आहेत. हा क्वालिटी कंट्रोलचा अहवाल मी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणार आहे, त्यानुसार जिल्हाधिकारी स्वत: पाहणी करून त्रुटींची पूर्तता करून घेत काही दिवसातच जनतेची सुरक्षा पाहून त्या घाटातून एकमार्गी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतील. मात्र, विरोधकांनी माझ्या विरोधातील वैयक्तिक हिशोब चुकता करण्यासाठी राजकारण करू नये, असा टोला मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी लगावला आहे.कणकवली येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश सावंत उपस्थित होते. मंत्री नितेश राणे म्हणाले, लोकशाहीत मला जशी जनतेची सेवा करायची आहे. तशीच विरोधकदेखील जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलन करत आहेत. जर जनतेचा फायदा होत असेल तर ते स्वागतार्ह आहे. करूळ घाटा संदर्भात ज्या ज्या जनतेच्या सूचना आल्या. त्यानुसार काम केले जात आहे.
अहवालात प्रमुख तीन त्रुटींचा उल्लेख
- या मार्गावरून होणारी वाहतूक लक्षात घेता सर्वसामान्यांनी सुरक्षेसाठी काम केले पाहिजे.
- ज्या ठिकाणी डोंगराकडील बाजू ठेकेदारांनी रुंदीकरणासाठी तोडली आहे, त्या ठिकाणी असलेली दगड, माती हटविली पाहिजे.
- अवघड वळणावर वाहनांच्या सुरक्षितेसाठी संरक्षक भिंत बांधण्याची आवश्यकता आहे.
महामार्गाच्या अभियंत्यांनी स्वत: पाहणी करून दिला अहवालते पुढे म्हणाले, करूळ-गगनबावडा रस्त्याच्या कामाबाबत क्वॉलिटी कंट्रोलकडून अहवालाची मी स्वतः मागणी केली होती. त्यात त्या ठेकेदाराने काम चांगले केले आहे का? याबाबत तो अहवाल हातात आला तर आम्ही निर्णय घेऊ शकणार होतो. महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी संतोष शेलार यांनी स्वतः घाट रस्त्याची पाहणी केली. त्यांनी रस्त्याचे काम पाहून त्यानुसार एक अहवाल दिलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे हा पाठविला जाईल.
विरोधकांसाठी मिनी बस पाठवितोविरोधकांनी धोका पत्कारून प्रवास करण्यापेक्षा आपण सर्वांनी एकत्रित प्रवास करुया. हा रस्ता सुरू करत असताना पाहिजे तर विरोधकांसाठी मिनी बस पाठवितो. विरोधकांनी त्यातून चांगल्या कामासाठी मतभेद बाजूला ठेवून नागरिक म्हणून आमच्या सोबत प्रवास करावा, असेही मिश्किलपणे मंत्री राणे यांनी सांगितले.
जलवाहतुकीसाठी प्रयत्न करणार !जिल्ह्यातील बंदरांच्या माध्यमातून समुद्रमार्गे जलवाहतूक व्हावी यासाठी सर्वोतोपरी माहिती घेतली जाईल. आवश्यक यंत्रणा व इतर बाबींची पूर्तता केल्यानंतर निश्चितपणे जलवाहतूक सुरू होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.