खारलँडचा बंधारा फुटण्याचा धोका
By Admin | Updated: July 12, 2014 00:26 IST2014-07-12T00:09:05+5:302014-07-12T00:26:14+5:30
पावसामुळे व खाडीच्या पाण्यामुळे या बंधाऱ्यावरची माती वाहून जाण्यास सुरुवात

खारलँडचा बंधारा फुटण्याचा धोका
जामसंडे : खारलँड विभागामार्फत जामसंडे बेलवाडी येथे बांधण्यात आलेला खारलँडचा बंधारा फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. या परिसरात पडणाऱ्या पावसामुळे व खाडीच्या पाण्यामुळे या बंधाऱ्यावरची माती वाहून जाण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे हा बंधारा अजून किती दिवस टिकेल असा प्रश्न स्थानिक शेतकऱ्यांना पडला आहे.
या बंधाऱ्याचे बांधकाम करताना बंधाऱ्याची धूप होऊ नये यासाठी बंधाऱ्याच्या बाजूला चिऱ्यांचा सपोर्ट देणे आवश्यक असतानाही तो देण्यात आलेला नाही. त्यामुळे बंधाऱ्यावरची माती वाहून जावू लागली आहे. तसेच खाडीचे पाणी शेतात येवू नये म्हणून लावण्यात आलेली झडपे पत्र्याची आहेत. या परिसरातील वातावरण व पाऊस यांचा विचार करता ही झडपे फायबरची असती तर नक्कीच उपयुक्त ठरली असती. मात्र, सध्या लावलेली पत्र्याची झडपे लवकरच गंजण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही झडपेही फार काळ तग धरू शकणार नाहीत.
गेली तीन चार वर्षे या शेतात शेतकरी शेती करत नाही. तसेच या परिसरातील विहिरींच्या पाण्यात खाडीचे पाणी गेल्याने पिण्याचे पाणीही खारे बनले आहे. यावर्षीही या परिस्थितीत काही फरक पडल्याचे दिसत नाही. त्यामुळे या बंधाऱ्याबाबत तत्काळ उपाययोजना केली नाही तर या भागातील शेतजमीन कायमचीच नापीक होण्याची शक्यता नाकारता येणारी नाही. खारलँड विभाग व संबंधित ठेकेदार यांच्या दुर्लक्षामुळे स्थानिक शेतकरी हवालदील झाले असून होणाऱ्या या नुकसानीला जबाबदार कोण? हा प्रश्न या शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे. (वार्ताहर)