योग्य आहार, व्यायाम हाच पर्याय

By Admin | Updated: June 27, 2014 00:53 IST2014-06-27T00:26:09+5:302014-06-27T00:53:18+5:30

मधुमेह दिन विशेष : तज्ज्ञांच्या मते वैद्यकीय सल्ला अधिक महत्त्वाचा

The right diet, exercise is the only option | योग्य आहार, व्यायाम हाच पर्याय

योग्य आहार, व्यायाम हाच पर्याय

अजय लाड ल्ल सावंतवाडी
मधुमेह हा दीर्घकालीन उपचार करावा लागणारा आजार आहे. मधुमेह या आजारात शरीरातील स्वादुपिंडाकडून पुरेसे इन्सुलिन तयार केले जात नाही, अथवा तयार झालेल्या इन्सुलिनला पेशींकडून प्रतिसाद मिळत नाही. या दोन्ही प्रकारात पेशींमध्ये ग्लुकोज शोषण्याच्या क्रियेत अडथळा निर्माण होतो. या आजाराने गंभीर स्वरुप घेतल्यास यात मृत्यू होण्याचा धोकाही निर्माण होतो. मधुमेह होण्याचे नेमके कारण अनभिज्ञ असून आनुवंशिक व जीवनशैली यामुळे हा आजार होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मधुमेह पूर्णपणे बरा होण्यासाठी अजूनही औषध सापडलेले नसले तरीही योग्य आहार, व्यायाम व इन्सुलिनच्या वापराने मधुमेह आटोक्यात ठेऊन सामान्य आयुष्य जगता येऊ शकते.
भारत देशात २७ जून रोजी मधुमेह रोगाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी मधुमेह दिन पाळला जातोे. शरीरात योग्यप्रकारे इन्सुलिन तयार न झाल्यास रक्तातील उपलब्ध ग्लुकोज पेशींना न मिळता रक्तातच राहते. मधुमेहाचे निदान व उपचार होण्याआधी रुग्णास सारखी तहान लागणे, पाणी जास्त पिणे, जास्तवेळा मूत्र विसर्जनास जावे लागणे, थकवा, चिडचिडेपणा, निरुत्साहपणा, वारंवार तोंड सुकणे, जनांगाना खाज येणे, भूक जास्त लागणे अशी लक्षणे दिसून येतात. अशावेळी मूत्र परीक्षणामध्ये ग्लुकोज जास्त प्रमाणात आढळून येते.
साधारणत: मधुमेहाचे पाच प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे नवजात मधुमेह. असा मधुमेह बालवयात वा प्रौढवयात प्रकट होतो. अशा रुग्णांच्या शरीरात इन्सुलिन कमी प्रमाणात अथवा इन्सुलिन तयारच होत नाही. तसेच शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण कमी किंवा जास्त होत असते. या रुग्णांना दररोज इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागते. तर दुसऱ्या प्रकारातील मधुमेह सहसा पन्नाशीच्या आत होत नाही. बैठे काम करणाऱ्या व्यक्ती, जास्त वजन असलेल्या व्यक्तींना अशा प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. या मधुमेहाला वयोमानानुसार होणारा मधुमेहही संबोधतात. या मधुमेहावर योग्य आहार, व्यायाम व तोंडावाटे घेण्यात येणाऱ्या औषधांनी नियंत्रण ठेवता येते. परंतु, याकडे दुर्लक्ष झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतात. तिसरा प्रकार म्हणजे कुमारवयात निदान होणारा मधुमेह. याप्रकारातील मधुमेहींच्या संख्येत वाढ होत आहे. हा मधुमेह वयाच्या १२ ते १७ या वयात आढळून येतो. चौथ्या प्रकारात महिलांना अतिलठ्ठपणामुळे गर्भारपणातही मधुमेहाला सामोरे जावे लागते. तसेच अतिगोड व तेलकट खाण्यामुळेही मधुमेहाला आमंत्रण मिळते. पाचव्या प्रकारात स्वादुपिंडाच्या विकारामुळेही मधुमेह होत असतो. या सर्व मधुमेहाच्या प्रकारात काळजी घेणे आवश्यक आहे.
मधुमेहाची लक्षणे दिसून आल्यास तत्काळ वैद्यकीय अधिकाऱ्याकडे जाणे योग्य ठरते. कंटाळा येणे, तीव्र तहान व मूत्र विसर्जनाचे प्रमाण वाढणे ही काही लक्षणे आहेत. वजनातील घट, जखमा बऱ्या होण्यास विलंब, मूत्रमार्गाचे संसर्ग, हिरड्यांचे आजार किंवा अंधुक दृष्टी या लक्षणांकडेही दुर्लक्ष होता कामा नये. मधुमेह झाल्याचे समोर येण्यास काही आठवडेही लागू शकतात अथवा काही वर्षेही मधुमेह झाल्याचे समजत नाही. यासाठी योग्यवेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेतल्यास मधुमेह झाल्याचे लक्षात येते. मधुमेहाचे निदान मूत्रपरीक्षण, रक्त तपासण्या करुन केले जाते.
जेवल्यानंतर ग्लुकोज परीक्षण, ग्लुकोज टोलरन्स टेस्ट आदीनेही मधुमेहाची खात्री आपल्याला करुन घेता येते. मधुमेहावर ठोस उपाय नसला तरीही रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण योग्य ठेवणे व मधुमेह नियंत्रणात ठेऊन त्याच्यामुळे होणाऱ्या आजारांवर रोख लावल्यास सामान्य जीवन जगता येऊ शकते. आहारातील योग्य बदल, पुरेसा व्यायाम केल्यास रोग आटोक्यात राहतो.
या सर्वांबरोबरच अशा व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ला घेणे खूप गरजेचे मानले जाते. डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याचा अवलंब केल्यास रुग्णाला मधुमेह आटोक्यात ठेवण्यात यश मिळते. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सूचीचिकित्सा तसेच वनौषधींच्या वापरानेही रक्तातील ग्लुकोज योग्य प्रमाणात राखले जाऊ शकते. मधुमेही व्यक्तीवरील ताण कमी होण्यासाठी योगा तसेच संमोहनही लाभदायक
ठरु शकते. मात्र, यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकाचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.

Web Title: The right diet, exercise is the only option

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.