भात शेतीतही क्रांती करा

By Admin | Updated: July 27, 2015 22:56 IST2015-07-27T22:56:02+5:302015-07-27T22:56:02+5:30

विनायक राऊत : कुडाळ येथे राईस मिलचे उद्घाटन

Revolution in rice cultivation | भात शेतीतही क्रांती करा

भात शेतीतही क्रांती करा

कुडाळ : राईस मिलच्या उभारणीने येथील शेतीला नवी दिशा तसेच आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळणार आहे. शेतकऱ्यांनी याचा फायदा घेत ऊस पिकाप्रमाणेच भातपिकातही क्रांती करावी, असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी केले.कुडाळ एमआयडीसी बजाज सिंधुदुर्ग राईस मिल लिमिटेड कंपनीचे भूमिपूजन पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते सोमवारी झाले. यावेळी मिल्सचे मालक सज्जन बजाज, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार पुष्पसेन सावंत, शंकर कांबळी, उद्योजक पुष्कराज कोले, सुभाष मयेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, कुडाळ सरपंच स्रेहल पडते, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र साळकर, शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, भाजपा तालुकाप्रमुख बब्रुवान भगत, काका कुडाळकर, प्रांताधिकारी रवींद्र बोंबले, मिल्सचे संचालक यतीन मयेकर, अनिल जैन, शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, संजय भोगटे व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार राऊत म्हणाले, युती शासनाचे आम्ही सेवक असून नुसत्या घोषणा करत नाही, तर प्रत्यक्ष कृती करतो. शेतकऱ्यांनी आता दुबार शेती करावी व त्यामध्ये चांगल्या प्रतीचे भातपीक घ्यावे. शेतकऱ्यांच्या जीवनात राईस मिल मोलाचा प्रकल्प असून परंपरागत शेती तंत्र बदलून आधुनिक पद्धती वापरून शेतीत नवनवीन भात पिके घ्यावीत, असे आवाहन केले. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, सर्व जनतेच्या विकासासाठी आमचे सदैव प्रयत्न असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास करण्यास आपण कटीबद्ध आहोत. भात गिरणीमुळे जिल्ह्यातील भात गोडाऊनमध्ये राहणार नाही, तर या मिलमधील अत्याधुनिक पध्दतीत असलेल्या स्टोअर्समध्ये राहील. तत्कालीन राज्यमंत्री एस. एन. देसाई यांनी याठिकाणी एमआयडीसी आणून उद्योगनगरी उभी केली. मात्र, त्यानंतर आलेल्या येथील उद्योगमंत्र्यानी एकही उद्योग याठिकाणी आणला नाही, असा टोला विरोधकांना लगावला. आम्ही केलेल्या विकासानेच टीकाकारांची तोंडे आपोआपच बंद होतील, असेही यावेळी केसरकर यांनी सांगितले.
आमदार नाईक म्हणाले, जिल्ह्याच्या विकासामध्ये ही भातगिरण महत्त्वाची भूमिका बजावेल व त्यामुळे येथील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सधन होईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी अतुल काळसेकर, पुष्पसेन सावंत, शंकर कांबळी व इतर मान्यवरांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
या भातगिरणीमध्ये दरदिवशी २०० टन भातावर प्रक्रिया केली जाणार असून, या भात गिरणीबरोबरच येथील फळावर फळप्रक्रिया उद्योगही सुरु करण्यात येणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली ही भात गिरण येत्या जानेवारी महिन्यापर्यंत पूर्ण केली जाईल, अशी प्रतिक्रिया मिल्सचे मालक बजाज यांनी दिली.
यावेळी जिल्ह्यातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये डॉ. प्रसाद देवधर, बापू नाईक, रामानंद शिरोडकर, सुहास सावंत, सुमित भोगले, उमेश ठाकूर, शिवाजीदादा कुबल, रमाकांत मल्हार व इतरांचा समावेश आहे.
यावेळी उपस्थित मान्यवर व जनतेला पेरूच्या कलमांचे वाटप बजाज मिल्सच्यावतीने करण्यात आले. या कार्यक्रमास शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

झपाट्याने विकास
राज्यातील सिंधुदुर्ग व पंढरपूर हे दोन जिल्हे सरकारने मायक्रो प्लॅनिंगकरिता निवडले असल्याने या जिल्ह्याचा विकास आता झपाट्याने होणार आहे. नारळ पिकाचे कार्यालयही लवकरच याठिकाणी आणणार असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

Web Title: Revolution in rice cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.