समर्थ हत्तीचा औषधोपचारांना प्रतिसाद
By Admin | Updated: April 28, 2015 00:21 IST2015-04-27T22:33:48+5:302015-04-28T00:21:57+5:30
पायाच्या जखमेवर उपचार : बेल्टसह क्रेनचा वापर सुरूच

समर्थ हत्तीचा औषधोपचारांना प्रतिसाद
माणगाव : क्रेनच्या सहाय्याने आधार दिलेल्या समर्थ हत्तीच्या प्रकृतीत सुधारणा होत असून रविवारी रात्री त्याने झोपून विश्रांती घेतली. सोमवारी सकाळी त्याला उठविण्यासाठी पुन्हा क्रेनचा वापर करावा लागला. बेल्टच्या सहाय्याने थोडासा आधार देताच समर्थ चुटकीसरशी पुन्हा उभा राहिला. त्याच्या पायावर जखमेवर औषधोपचार सुरू आहेत.
गेला आठवडाभर समर्थ हत्तीच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने तो मंद होता. सकाळी उठण्यासाठी त्याला सलाईन लावावी लागत होती. मात्र, रविवारी नेहमीपेक्षा क्रेनचा आधार घेत उठला असला, तरी त्याच्या प्रकृतीचा धोका टळला असल्याचे वनविभागाने सांंगितले. समर्थच्या आजारपणामुळे वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी मात्र आंबेरी येथे त्याच्या देखरेखीसाठी ठाण मांडून आहेत. त्याच्या खाण्यापिण्यासह प्रात:विधीचा काटेकोरपणे नमुना घेणे, त्याला वेळच्यावेळी पाणी, औषधे व विशेष म्हणजे बेलडेमाड, मक्याची झाडे असे जीवनसत्व मिळणारे खाद्य जास्त प्रमाणावर देण्याची प्रक्रिया वनविभागाने चालू ठेवली आहे. त्याचप्रमाणे डॉ. उमाशंकर यांचे सहाय्यक करिमभैय्या व बाबुराव मोरे आंबेरी येथे हत्तीच्या तब्येतीची विशेष काळजी घेत आहेत.
समर्थ हत्तीची प्रकृती शनिवारी खूपच खालावल्याने प्रभारी उपवनसंरक्षक प्रकाश बागेवाडी, सहाय्यक उपवनसंरक्षक एस. पी. बागडी, वनक्षेत्रपाल संजय कदम, वनपाल रामकृष्ण सातव यांच्यासह वन विभागाचे कर्मचारी हवालदिल झाले होते. रविवारी क्रेनच्या सहाय्याने समर्थला उभे करण्यात आल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकत त्याची काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी सकाळी क्रेनचा आधार घेऊन उठला असला तरी सोंडेने अंगावर पाणी उडवून घेऊन तरतरीत झाल्याचे दिसत होते.
दरम्यान, समर्थ हत्तीची तब्येत खालावल्याने वन विभागाने गांभीर्य ओळखून कर्नाटक येथील करिमभैय्या व बाबुराव मोरे यांना पाचारण केले असल्याने समर्थच्या जीवाचा धोका टळला आहे. या घटनेने अनेक लोकप्रतिनिधींनी आंबेरी येथे भेट देत वनविभागाला फुकटच्या सूचनाही केल्या. तज्ज्ञ डॉक्टर आणा, खाद्य भरपूर द्या, अशा सूचना देण्यापेक्षा सध्या हत्तीच्या खाण्यापिण्याचा दिवसाचा खर्च सुमारे दहा हजार एवढा आहे. शासनस्तरावर आर्थिक तरतूद झाली नसल्याने अधिकारी आपल्या क्रेडिटवर धान्य, खाद्य, औषधे व क्रेन व इतर वाहने आणित आहेत. लोकप्रतिनिधींनी भेट देताना हत्तीचे खाद्य व औषधेही आणून सहकार्य करावे, अशी सूचना प्राणीमित्रांनी केली आहे. (प्रतिनिधी)