संभाव्य आपत्तीपासून सुटका
By Admin | Updated: November 2, 2014 00:44 IST2014-11-02T00:44:23+5:302014-11-02T00:44:23+5:30
अग्निशमन दल स्थापन : कुडाळ एमआयडीसी परिसर संरक्षित

संभाव्य आपत्तीपासून सुटका
रजनीकांत कदम, कुडाळ : कुडाळ एमआयडीसी स्थापन झाल्यापासून मंजूर असूनदेखील सन २०१३ पर्यंत अग्नीशमन केंद्र नसलेल्या कुडाळ एमआयडीसीमध्ये अत्याधुनिक अग्नीशमन बंबाबरोबरच अत्याधुनिक अग्नीशमन दल या ठिकाणी प्रत्यक्षात उद्योगमंत्री असताना नारायण राणे यांनी आणल्याने कुडाळ एमआयडीसीबरोबरच कुडाळ शहर आणि तालुक्याची आगीपासून निर्माण होणाऱ्या आपत्तीपासून सुटका झाली आहे. तत्कालीन राज्यमंत्री एस. एन. देसाई यांनी या जिल्ह्याचा विकास औद्योगिक क्षेत्रात झपाट्याने व्हावा, या जिल्ह्यातील बेरोजगारांना या ठिकाणी रोजगार मिळावा, या ठिकाणच्या स्थानिक उत्पादन, फळे यांच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे रहावेत, जेणेकरून येथील शेतकरी सधन होईल, या उद्देशाने कुडाळ येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीसीची स्थापना करण्यात आल्यानंतर येथे वायमन गार्डन, मेल्ट्रॉनसारखे मोठे कारखाने अस्तित्वात आले. यानंतरच्या कालावधीत काही कारखाने काही कारणास्तव बंद पडले. तर अजूनही काही चालू आहेत. तसेच याठिकाणी आता या ठिकाणच्या उत्पादनावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू आहेत. ज्या ठिकाणी एमआयडीसी असते, त्या ठिकाणी एमआयडीसी महामंडळाने येथील उद्योगांना सर्व आवश्यक सोयीसुविधांचा पुरवठा करणे आवश्यक असते. यामध्ये पाणी पुरवठा, वीज या व अशा अनेक सोयीसुविधांबरोबरच सर्वात महत्त्वाची व्यवस्था म्हणजे आपत्ती काळासाठी अत्यावश्यक असलेले सुसज्ज असे अग्नीशमन दल. अग्नीशमनची सोयच नव्हती कुडाळ एमआयडीसीचा विचार करता, या ठिकाणीही महामंडळाच्या नियमानुसार अग्नीशमन बंब व दलाची मंजुरी होती. मात्र, स्थापन झाल्यापासून सन २०१३ पर्यंत या ठिकाणी अग्नीशमन दल सोडाच, आगीपासून संरक्षण करणारी अथवा आग शमविणारी कोणतीच उपाययोजना नव्हती. त्यामुळे येथील सुरक्षा तशी ‘राम भरोसे’च होती, असे म्हणावे लागेल. अचानक आग लागल्यास येथील कारखानदारांनी काय केले असते, याचा विचारही कठीण आहे. तसेच कुडाळ शहर आणि तालुक्यातही अशा प्रसंगी सावंतवाडी किंवा वेंगुर्ले अग्नीशमन दलाची वाट पहावी लागत असे. परंतु आता ही सोय झाल्यामुळे प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे.