वीज, रस्त्यांसाठी ५० कोटींचा निधी प्राप्त
By Admin | Updated: June 26, 2014 00:09 IST2014-06-26T00:08:24+5:302014-06-26T00:09:52+5:30
प्रमोद जठार : कणकवलीत अधिकाऱ्यांची आढावा बैठक

वीज, रस्त्यांसाठी ५० कोटींचा निधी प्राप्त
कणकवली : सागरी किनारपट्टीच्या भागात वीजवाहिन्या उभारणे आणि जिल्ह्यातील रस्ते कामांसाठी एकूण ५० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. आढावा बैठकीत अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. आमदार प्रमोद जठार यांनी विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक येथील शासकीय विश्रामगृहात घेतली. यावेळी केंद्रसरकारच्या अखत्यारितील प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे जठार यांनी सांगितले.
सागरी किनारपट्टीवर वीजवाहिन्यांचे काम करण्यासाठी २५ कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. किनारपट्टीच्या भागात जमिनीखालून वीजवाहिन्या टाकण्यात येणार असून अधिक निधी मिळाल्यास शहरी भागातही जमिनीखालून वाहिन्या टाकल्या जाऊ शकतात, असे वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. २०१३ अखेर मंजूर ८४ शेतीपंपांची कामे आॅगस्ट महिन्यापासून सुरू होणार आहेत. गंजलेले ८५३ विद्युत खांबही बदलण्यात येत असून पुणे येथील कंपनीकडे हे काम देण्यात आले आहे. कार्यालयाच्या दूरध्वनीवर तक्रारी न स्विकारता टोल फ्री क्रमांकावर स्विकाराव्यात असे वरिष्ठांचे आदेश असल्याने ग्राहकांनी वीजबिलावरील टोल फ्री क्रमांकावर तक्रारी कराव्यात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच तालुक्यातील तक्रारींसाठी ७८७५७६५०८४ आणि शहरासाठी ७८७५७६५१०६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागासाठी २५ कोटींचा निधी आला आहे. यातून विविध रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार आहेत. आमदार जठार यांनी विभागांतर्गत रस्त्यावर कोणत्या ठिकाणी पूल उभारणे आवश्यक आहे याची मागणी केल्यास त्याचा पाठपुरावा करू, असे सांगितले. कृषी विभागाच्या आढाव्यात यंदा फळझाड लागवडीचे फक्त ४०० हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ते किमान २ हजार हेक्टर करण्यात यावे. अनुदानीत साहित्याच्या यादीतून ग्रासकटर वगळण्यात आले आहे. त्याचा समावेश करण्यात यावा. तसेच अनुदानातून मोठ्या ट्रॅक्टरचा पुरवठा व्हावा, अशा सूचना मांडल्या. कणकवली व तळेरे येथे ट्रॉमा केअर सेंटर्स मंजूर झाली आहेत. त्यासाठी अडीच कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. तळेरे येथे जागा उपलब्ध झाली नसल्याने काम सुरूच होऊ शकलेले नाही. तर कणकवली सेंटरचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, त्यासाठी वैद्यकीय पदे मंजूर नाहीत, असे उपजिल्हा रूग्णालयाच्या डॉ.जाधव यांनी माहिती दिली. कासार्डे येथील आरोग्य केंद्राच्या आवारात जागा उपलब्ध असल्याचे सांगून आमदार जठार यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आरोग्य विभागाने या जागेसाठी मान्यता दिल्याचे सांगितले. यावेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्षा राजश्री धुमाळे, तालुकाध्यक्ष शिशीर परूळेकर, परशुराम झगडे, रविंद्र शेटये आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)