रत्नागिरी : उष्मा वाढल्याने विजेची अधिक मागणी
By Admin | Updated: September 20, 2014 00:34 IST2014-09-19T23:02:55+5:302014-09-20T00:34:49+5:30
कमी पाऊस : १३ हजार ६०७ मेगावॅट मागणीची नोंद- दरवाढीचा महानगरपालिका क्षेत्रास फटका; कोकण परिमंडलास दिलासा

रत्नागिरी : उष्मा वाढल्याने विजेची अधिक मागणी
रत्नागिरी : गेले दहा बारा दिवस पावसाने उघडीप घेतली आहे. कडकडीत ऊन पडत असल्याने उकाडा वाढला आहे. परिणामी राज्यात विजेची मागणी वाढली आहे. शुक्रवारी दुपारी १३ हजार ६०७ मेगावॅट इतकी विजेची मागणी नोंदविण्यात आली होती.
गणेशोत्सव कालावधीत पाऊस बऱ्यापैकी कोसळत असल्यामुळे साडेदहा हजार ते अकरा हजार मेगावॅट इतकी विजेची मागणी करण्यात आली होती. कोळशाचा तुटवडा जाणवत असल्याने वीजनिर्मितीवर परिणाम झाला आहे. मात्र औष्णिक जलविद्युत, गॅस, खासगी प्रकल्पातून उत्पादित विजेतून ग्राहकांना मागणीप्रमाणे वीजपुरवठा करण्यात येत आहे.
ऐन उन्हाळ्यात (एप्रिल-मे) १४ ते १५ हजार मेगावॅट इतकी विजेची सर्वोत्तम मागणी नोंदविण्यात आली होती. सध्या जलविद्युत प्रकल्पातील निर्मिती संच देखभाल दुरूस्तीसाठी बंद आहेत. एखाददुसऱ्या संचाव्दारे वीजनिर्मीती करण्यात येत आहे. त्यामुळे केंद्र शासनाकडून ५ हजार ५४३ मेगावॅट वीज आयात करण्यात येत आहे. औष्णिक प्रकल्पाव्दारे ४ हजार ३८७ मेगावॅट, कोयना जलविद्युत प्रकल्पातून ८०० मेगावॅट, उरण गॅस प्रकल्पातूल ४७६ मेगावॅट तर खासगी (जिंदाल, अदानी, आयडियल) प्रकल्पातून ३ हजार ५६० मेगावॅट विजेचा पुरवठा होत असल्याने ग्राहकांना वीजेचा पुरवठा करण्यात येत आहे.
दसऱ्यापर्यत पाऊस पडतो. परंतु तरीही प्रमाण मात्र कमी होत चालले आहे. हवामानातील बदलामुळे विजेची मागणी भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. कोळसानिर्मिती प्रकल्पास जर कोळसा पुरवठा वेळेवर न झाल्यास भारनियमनाचा धोका आहे. गणेशोत्सव संपून २० ते २२ दिवस झाले असले तरी २० दिवसात दोन ते अडीच हजार मेगावॅट इतकी मागणी वाढली आहे. हवामान कोरडे राहिले तर यापुढे वीजेची मागणी वाढण्याची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालल्याने वीज टंचाई भासणार आहे.(प्रतिनिधी)
पावसाने दडी मारली वीजेची मागणी वाढली
यंदा दसऱ्याआधी पाऊस कमी
देखभाल दुरूस्तीसाठी बंद आहेतजलविद्युत केंद्रातील निर्मिती संच
अपवाद एखाद दुसऱ्या संचाचा
वीजपुरवठा अधिक कसा होईल यासाठी आता प्रयत्न
सर्व प्रकल्पातील उत्पादीत वीजेतून होतोय वीज पुरवठा
दरवाढीचा महानगरपालिका क्षेत्रास फटका; कोकण परिमंडलास दिलासा
रत्नागिरी : विजेची मागणी वाढल्यानंतर केंद्र शासनाकडून विज आयात करावी लागते. महावितरणच्या धोरणानुसार ही रक्कम कर स्वरूपात असल्याने नियमानुसार ती स्थानिक ग्राहकांकडून वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अतिरिक्त दरवाढ म्हणून महानगरपालिका क्षेत्रातील ग्राहकांच्या बिलातून रक्कम वसूल केली जाणार आहे. कोकण परिमंडलात महापालिका नसल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
महानगरपालिका हद्दीत एलबीटी कर लागू करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने स्थानिक कर महावितरणला आकारला होता. हा कर तेथील ग्राहकांकडून नियमित वसूल करून स्थानिक संस्थेला देण्यात येणार आहे. त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील ग्राहकांकडून करवसूली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबाद महानगरपालिकेस विजेवर २१.६८ कोटी रूपये भरण्यास महावितरणला आदेश देण्यात आले आहे. संबंधित रक्कम किती महिन्यात वसूल करायची याचा निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र एका महिन्यात ही रक्कम वसूल केल्यास प्रतियुनिट २.२५ रू. असा भार ग्राहकांवर येईल. जर काही महिन्यात रक्कम वसूल करायचे ठरल्यास व महानगरपालिकेने व्याज आकारल्यास त्यानुसार यात बदल होणार आहेत.
कोकण परिमंडलात रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यात महापालिका नसल्यामुळे येथील ग्राहकांना संबंधित करातून दिलासा मिळाला आहे. परंतु औरंगाबादप्रमाणे नागपूर तसेच अन्य महापालिका हद्दीतील ग्राहकांना कराचा भूर्दंड बसणार आहे. कोकण परिमंडलास महापालिका नसल्याचा दिलासा मिळणार आहे. (प्रतिनिधी)