रत्नागिरी : आंबा भरपाईचे २७ कोटी शिल्लकच
By Admin | Updated: September 20, 2014 00:21 IST2014-09-19T23:18:02+5:302014-09-20T00:21:48+5:30
अपूर्ण कागदपत्रे: कृषी विभाग बघतोय शेतकऱ्यांची वाट

रत्नागिरी : आंबा भरपाईचे २७ कोटी शिल्लकच
रत्नागिरी : फुलकिडे (थ्रीप्स) यामुळे आंबा पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाकडून हेक्टरी १५ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. त्यानुसार २१ कोटी ८ लाखाचा निधी जिल्ह्यातील ४१ हजार ३७७ शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला आहे. परंतु अपूर्ण कागदपत्र तसेच संपर्काच्या अभावामुळे २७ कोटी १३ लाखांचा निधी कृषी विभागाकडे अद्याप पडून आहे.
थ्रीप्सचा प्रादुर्भाव (२०१२-१३) साली झाला होता. परिणामी आंबा पीक धोक्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी शासनाकडून मदत म्हणून हेक्टरी पंधरा हजार रुपये जाहीर करण्यात आले. मात्र, त्यासाठी दोन हेक्टरची मर्यादा घालण्यात आली होती. गेल्या दीड वर्षांपासून शेतकऱ्यांना आंबा पीक नुकसानभरपाईचे वितरण सुरु आहे. जिल्ह्यातील ४१ हजार ३७७ शेतकऱ्यांना २१ कोटी ८ लाखांचा निधी वितरित करण्यात आला. परंतु २७ कोटी १३ लाखांचा निधी अद्याप शिल्लक राहिला आहे.
जिल्ह्यातील बहुतांश मंडळी नोकरी व्यवसायानिमित्त मुंबई व अन्य शहरामध्ये राहतात. परिणामी गावाकडे येणे मर्यादित असते. तसेच काही शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सात-बारावर अनेक नावे असल्याने संबंधितांची संमतीपत्र त्यासाठी आवश्यक आहेत. एकूणच विविध कारणास्तव शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे संपर्क न केल्याने नुकसानभरपाईचा निधी अद्याप शिल्लक राहिला आहे. वेळोवेळी कृषी विभागाकडून आवाहन करुनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर निधी तसाच पडून आहे. (प्रतिनिधी)