रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेती संकटात- हळव्या, निमगरव्या पिकाच्या उत्पादकतेवर परिणाम : वाघमोडे

By Admin | Updated: August 1, 2014 23:17 IST2014-08-01T22:10:12+5:302014-08-01T23:17:08+5:30

शेतकरी संभ्रमात : भात लावणीचा हंगाम अंतिम टप्प्यात

Ranchi crisis in Ratnagiri district: Results on productivity of halva, low yielding crops: Waghamode | रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेती संकटात- हळव्या, निमगरव्या पिकाच्या उत्पादकतेवर परिणाम : वाघमोडे

रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेती संकटात- हळव्या, निमगरव्या पिकाच्या उत्पादकतेवर परिणाम : वाघमोडे

रत्नागिरी : जिल्ह्यात पेरणी वेळेत झाली. मात्र, यावर्षी पाऊस जुलैपर्यंत लांबल्यामुळे भात लागवडीला उशिरा प्रारंभ झाला. अद्याप लागवड सुरू आहे. परंतु लागवडीचा कालावधी लांबल्यामुळे रोपवाटिकेत फुटवे प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे हळव्या, निमगरव्या भाताच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम होणार असून, उत्पादन घटू शकते, असे मत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठअंतर्गत शिरगावच्या कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. बी. डी. वाघमोडे यांनी व्यक्त केले.
हळवे भात तयार होण्यासाठी २१ दिवस, निमगरव्या भातासाठी २५ दिवस, तर गरव्या भातासाठी २८ दिवसांचा कालावधी पुरेसा असतो. जूनमध्ये लागलेल्या पावसावर भाताची पेरणी करण्यात आली. मात्र, एक महिनाभर पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे रोपांच्या वाढीवर परिणाम झाला. काही ठिकाणी करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. लागवड प्रक्रियाही लांबली होती. हळव्या भाताच्या रोपवाटिकेत फुटवे येण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. आषाढी एकादशीपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्यानंतर लागवड प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे हळव्या जातीच्या भाताच्या रोपाला फुटवे येऊन फुलोरा येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बाहेरून ही प्रक्रिया दिसत नसली तरी आतून लोंबी येण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे हळव्या व निमगरव्या भाताच्या उत्पादनात ३० ते ४० टक्के घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गरव्या जातीच्या भाताला मात्र तितकासा धोका नाही. अद्याप भात लागवड सुरू आहे. विद्यापीठांतर्गत शिरगाव येथे १९१३ साली कृषी संशोधन केंद्राची स्थापना झाली. सुरूवातीला पटणी, पनवेल, वाकसाल, वरंगळ, सोरटी, कोलंब प्रकारचे भात शेतकरी लावत असत. १९६० ते ७३ हा काळ हरित क्रांतीचा होता. तायचुंग नेटीव्ह १ आणि आयआर ८ या जातीच्या जनुकांचे संकरीकरण करून रत्नागिरी २४ बारीक दाण्याची जात विकसीत करण्यात आली. भाताच्या नऊ सुधारित जाती (रत्नागिरी २४, रत्नागिरी ६८-१, रत्नागिरी ७११, रत्नागिरी ७३-१, रत्नागिरी १, २, ३, ४, ५) आणि एक संकरित जात (सह्याद्री ५) विकसीत करण्यात आली आहे.
जमिनीचा पोत ओळखून अधिक उत्पादन देणाऱ्या जाती विकसीत करण्यात आल्या आहेत. ६० ते ६५ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये वाढ होऊन ७७ हजार ४८० हेक्टर क्षेत्र भात पिकाखाली आहे. कोकणाची भात उत्पादकता १.८ टन प्रतिहेक्टर होती ती आता ३.४ टन आहे. पश्चिम महाराष्ट्राची उत्पादकता १.१२ वरून २.४९ इतकी झाली आहे. १७ मादी वाणाची निर्मिती केली असून, ज्याचा उपयोग सध्या संकरित बीज निर्मितीसाठी होत आहे.
केंद्राने कोकण टपोरा व कोकण गौरव या भुईमुगाच्या जाती विकसीत केल्या आहेत. त्यामुळे वरकस व पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत भुईमुगाचे पीक घेण्यात येत आहे. याशिवाय पांढऱ्या रंगाच्या नागलीची जात विद्यापीठाने विकसीत केली आहे. कारळा लागवड शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे.
सरबतासाठी अमृत कोकम ही जात केंद्राने विकसीत केली. केंद्राने लांब दाण्याच्या, अधिक प्रत असलेल्या आणि लाल दाण्याच्या संकरित भात वाणाचे संशोधन सुरू केले आहे. या तांदळामुळे लोह, कॅल्शियम, झिंक मिळणार असल्याचे डॉ. वाघमोडे यांनी सांगितले. नव्या संशोधनाचा फायदा शेतकऱ्यांना ़निश्चित मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)

दापोली : कोकणात गेल्या २८ वर्षांनंतर संपूर्ण जून महिना पहिल्यांदाच कोरडा गेला. यामुळे कोकणातील मुख्य उत्पादन असणारे भातपीक शेतकऱ्यांच्या हातातून निसटते की काय, अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृ षी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. उत्तमकुमार महाडकर यांनी कोकणातील भात शेतीवर फारसा परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु शेतकऱ्यानी यापुढे भातशेतीची योग्य काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.
मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागात जून महिन्यात पाऊस न पडल्याने पेरणी लांबली. काही शेतकऱ्यानी पेरणी केली होती, ती करपली. त्यामुळे दुबार पेरणी करावी लागली. त्या तुलनेत कोकणातील शेतकऱ्यांना तशा प्रकारची पेरणी करण्याची वेळ आली नाही. कोकणात साधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होतो. त्यामुळे पावसाच्या पूर्वी धूळवाफेवर आणि पावसाच्या सुरुवातीला साधारण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केली जाते. पेरणी झाल्यावर २१ दिवसांनी रोपे तयार होतात. त्यानंतर रोपे लावली जातात. पेरणी वेळेत होऊनसुद्धा जून महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे भातलावणीला उशीर झाला. लावणीला उशीर झाला असला तरीही रोपे जाग्यावर वाढल्यामुळे ती परिपक्व झाली होती. त्यामुळे कोकणातील भातरोपाची फारशी हानी झाली नाही. मात्र, काही भागात मॅट नर्सरीतील रोपे थोड्याफार प्रमाणावर करपली होती. अशा रोपांची काळजी घेण्याचा सल्ला विद्यापीठ शास्त्रज्ञांकडून देण्यात आला होता.
यावर्षी जुलैअखेर लावणी सुरु आहे. शेतकऱ्यांना दोन ते तीन आठवडे उशीर झाला आहे. त्यामुळे उत्पन्नावर थोड्याफार प्रमाणावर परिणाम होऊ शकतो. परंतु ते टाळणे शक्य आहे, असे ते म्हणाले. शेतकऱ्यानी खताची मात्रा वाढविणे गरजेचे आहे. २५ ते ३० टक्के मात्रा वाढवल्यास पिकाचा कालावधी भरुन निघेल व उत्पन्नात होणारी घट टाळता येईल. त्यासाठी भातपिकावरील रोगाचीसुद्धा वेळेत काळजी घेणे गरजेचे आहे.
कृषी विद्यापीठाने संशोधनातून भाताच्या नवीन जाती आधुनिक तंत्रज्ञान तयार केल्या आहेत. पारंपरिक पद्धतीची भातलावणी न करता विद्यापीठाने सुरु केलेल्या चारसूत्री पद्धतीने भात लावणी केल्यास उत्पन्नात नक्कीच वाढ होते. जून महिना कोरडा गेल्यामुळे येथील काही शेतकऱ्यांची थोड्याफार प्रमाणात रोपे करपली होती. परंतु त्यानंतर पडलेल्या पावसाने ती परिस्थिती सुधारली. त्यामुळे पिकाचे होणारे नुकसान टळले, असे ते म्हणाले.(प्रतिनिधी)

जून महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे भातलावणी होऊ शकली नाही. त्यामुळे लावणी उशिरा झाली. याचा सर्वच भातपिकावर विपरित परिणाम होईल, असे म्हणता येणार नाही. परंतु पावसाअभावी उशिरा लावणी झाल्याने काही ठिकाणी उत्पन्नावर मात्र थोडाफार परिणाम होऊ शकतो. कारण प्रत्येक जातीच्या पेरणीचा व लागवडीचा कालावधी ठरलेला असतो. त्या वेळेत ते झाले नाही तर उत्पन्नावर थोडा परिणाम होऊ शकतो.
- डॉ. उत्तमकुमार महाडकर, संशोधन संचालक,
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

Web Title: Ranchi crisis in Ratnagiri district: Results on productivity of halva, low yielding crops: Waghamode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.