छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'त्या' पुतळ्याचे 'राम सुतार आर्ट' कंपनीला काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2024 06:50 IST2024-12-15T06:48:11+5:302024-12-15T06:50:07+5:30
या कंपनीने याआधी गुजरातमधील 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे काम पाहिले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'त्या' पुतळ्याचे 'राम सुतार आर्ट' कंपनीला काम
लोकमत न्यूज नेटवर्क, मालवण (जि. सिंधुदुर्ग): मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन ६० फुटी पुतळा उभारण्याचे काम ख्यातनाम शिल्पकार राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्या कंपनीला देण्यात आले आहे. राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रा.लि. या कंपनीने याआधी गुजरातमधील 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे काम पाहिले होते.
नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ डिसेंबर २०२३ रोजी राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. मात्र, हा पुतळा २६ ऑगस्ट रोजी कोसळला. त्यानंतर नव्याने पुतळा उभारण्यासाठी बांधकाम विभागाने २० कोटी रुपयांची निविदा मागविली होती. यात इतर बोलीदारांच्या कोटेशनची तुलना केल्यानंतर राम सुतार यांच्या कंपनीला २०.९५ कोटींमध्ये हे काम देण्यात आले.
हे काम त्यांना सहा महिन्यांत पूर्ण करावे लागेल. तसेच १०० वर्षे टिकेल असा पुतळा बांधण्याची अट घातली गेली आहे, तर कंत्राटदार कंपनीने १० वर्षे पुतळ्याची देखभाल आणि दुरुस्ती करण्याचीही अट आहे, अशी माहिती बांधकाम विभागातील सूत्रांनी दिली.