मतांच्या विभागणीवर राजापूरची गणितं....

By Admin | Updated: October 8, 2014 23:00 IST2014-10-08T22:46:29+5:302014-10-08T23:00:57+5:30

तुटलेली युती अन् आघाडी : चौरंगी लढतीमुळे निवडणुकीत रंगत

Rajapur's mathematics on the division of votes .... | मतांच्या विभागणीवर राजापूरची गणितं....

मतांच्या विभागणीवर राजापूरची गणितं....

राजापूर : तुटलेली युती आणि न झालेली आघाडी या पार्श्वभूमीवर राजापूर -लांजा - साखरपा विधानसभा मतदारसंघात एकूण आठ उमेदवार रिंगणात असले तरी प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपा यांच्यातच चौरंगी लढत पहावयास मिळेल. यामध्ये मतांची होणारी विभागणी इथली राजकीय गणिते कशी बिघडवते, त्यावरच उमेदवारांच्या विजयाचे गणित ठरणार आहे. त्यामुळे मागील काही निवडणुकांप्रमाणे यावेळीही निवडणूक रंगतदार ठरणार आहे.
सन १९९९नंतर पुन्हा एकदा राजापूरच्या रिंगणात जास्त उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. प्रथमच लढलेला राष्ट्रवादी काँग्रेस नंतरच्या निवडणुकीत काँग्रेससमवेत आघाडी करत होती. मात्र, यावेळी आघाडी तुटली व राष्ट्रवादीने रिंगणात उडी मारली आहे. आजवर शिवसेनेशी युती करुन लढणारा भाजपदेखील यावेळी स्वबळावर रिंगणात उतरला आहे. त्यामुळे भाजपचे कमळ प्रथमच संपूर्ण मतदारसंघात पोहोचत आहे. या निवडणुकीत पक्ष निशाणीसह घराघरात पोहोचवायचा, हेच भाजपाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे काँग्रेस शिवसेनेसह आता राष्ट्रीय पातळीवरील हे दोन्ही पक्ष राजापूरच्या रणांगणात शड्डू ठोकून उभे ठाकले आहेत. परिणामी येथे चौरंगी लढत होणार आहे. मात्र, खरी लढत ही शिवसेना व काँग्रेस यांच्यामध्ये होणार आहे.
या मतदारसंघात जिल्हा परिषदेचे एकूण अकरा गट व त्याअंतर्गत बावीस पंचायत समिती गण येतात. त्यातील काँग्रेस व भाजपाकडे प्रत्येकी एक जिल्हा परिषद असून, उर्वरित नऊ गटांवर सेनेचा कब्जा आहे. पंचायत समितीचे चार गण काँग्रेसकडे असून, दोन राष्ट्रवादीकडे आहेत. उर्वरित सोळा पंचायत समिती गणांवर शिवसेनेचा भगवा आहे. फक्त राजापूर नगर परिषदेमध्ये काँग्रेसचे दहा व राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक आहेत. येथे सेनेचे तीन व भाजपाचे दोन नगरसेवक आहेत. या मतदारसंघात पंचायत समिती व जिल्हा परिषदेत भाजपचा एकही सदस्य नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मूळ पाया ठरणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये जास्त वर्चस्व सेनेचे असून, त्याखालोखाल काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षांचे आहे. येथेदेखील किरकोळ प्रमाणात भाजपाचे स्थान आहे. हे चित्र या मतदार संघातील आजची परिस्थिती दर्शविते. मनसेने यावेळी उमेदवार उभा न केल्याने त्यांची मते कोणत्या उमेदवाराला पडतात, हादेखील महत्त्वाचा भाग आहे.
प्रमुख पक्षांदरम्यान चौरंगी लढत होत असल्याने यावेळी मतांची होणारी विभागणी विजयाची गणिते बिघडवणारी ठरु शकतात. याचा फटका विभक्त झालेल्या आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादीला बसणार आहे. यापूर्वी एकत्र लढूनदेखील विजयाचे उद्दिष्ट त्यांना गाठता येत नसे. त्यामुळे संशयाची सुई कायम राष्ट्रवादीभोवती फिरायची. रत्नागिरीत शिवसेना राष्ट्रवादीला छुपी साथ देते. त्याची परतफेड राष्ट्रवादी राजापूर मतदार संघात सेनेला मते देऊन करते, अशी चर्चा गेल्या चार - पाच वर्षांपासून सुरू आहे.
यावेळी स्वतंत्र उमेदवार रिंगणात असल्याने अशी छुपी युती होण्याचा प्रश्नच राहिलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीकडून मिळणारी काही मते सेनेला गमवावी लागतील. त्यामुळे सेनेला राष्ट्रवादीबरोबरच भाजपाच्याही मतांना मुकावे लागणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Rajapur's mathematics on the division of votes ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.