राजापूरची वखार ही पराक्रमाची गाथा
By Admin | Updated: November 10, 2014 23:59 IST2014-11-10T23:06:29+5:302014-11-10T23:59:35+5:30
बाबासाहेब पुरंदरे : उलगडले शिवछत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू

राजापूरची वखार ही पराक्रमाची गाथा
राजापूर : छत्रपती शिवरायांच्या काळात इतिहासभूमी म्हणून राजापूरला फार मोलाचे स्थान आहे. याच भूमीत बाळाजी आवजी चित्रे यांच्यासारखा हिरा राजांना लाभला. अफझलखानावरील स्वारीशी याच राजापूरचा निकटचा संबंध होता, तर गोमंतक मोहिमेची तयारी इथेच पार पडली. अशा राजापुरातील ब्रिटिशांची जिंकलेली वखार ही छत्रपतींच्या पराक्रमाची गाथा होती. त्यामुळे जीर्णावस्थेतील वखार पाडणे ही मोठी चूक होती, अशी खंत ज्येष्ठ इतिहासकार, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी राजापुरातील आयोजित कार्यक्रमादरम्यान व्यक्त केली.
राजापुरातील मित्रमेळा आयोजित शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्याख्यानाला मोठी गर्दी उसळली होती. सायंकाळी ५ वाजता सुरु झालेला कार्यक्रम तब्बल दोन तासापेक्षा अधिक काळ चालला.
जंजिऱ्याच्या सिध्दीने परदेशात गुलाम म्हणून विक्री करण्यासाठी पाठवलेल्या कुटुंबाचा लिलाव राजापुरात झाला होता. तो विसाजी शंकर तुंगारे यांनी घेतला होता. यामध्ये त्या तुंगारेंची बहीण व मुले यांचा समावेश होता. त्यातील एक मुलगा बाळाजी याने महाराजांना पाठवलेल्या पत्राचा आशय व त्याचे सुंदर हस्ताक्षर पाहून महाराज कसे प्रभावीत झाले आणि तो मुलगा पुढे बाळाजी आवजी चित्रे ऊर्फ चिटणीस कसा झाला याचा इतिहासच त्यांनी सादर केला. त्यानंतर अष्टप्रधान मंडळात बाळाजीला स्थान देताना छत्रपती राजे व बाळाजी यांच्यातील झालेले संभाषण विषद केले. इतिहास काळातील सापडलेले दस्तऐवज कसे होते, त्याचे दाखले शिवरायांनी दिले.
राजापूरच्या खाडीत अफजलखानाची तैनात असलेली तीन जहाजे ताब्यात घेण्यासाठी महाराजांचा मावळा दादोजी कसा चालून आला, त्याच्या भीतीने दोन जहाजे खोल समुद्रात निसटण्यात यशस्वी ठरली, त्यांना पलायन करण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या इंग्रजांना अद्दल घडवण्यासाठी राजापूरची वखार महाराजांच्या आदेशानुसार लुटली गेली. त्या इतिहासाची एकेक पाने शिवरायांनी उलगडली. छत्रपती शिवाजी राजांनी कोकणचा प्रांत जिंकला होता. त्यामध्ये राजापूरच्या वखारीचादेखील समावेश होता. त्यामुळे ती ब्रिटिशांची असली तरी छत्रपतींच्या शौर्याची, पराक्रमाची गाथा होती. अशी वखार जिर्णावस्थेत असल्याचे कारण देऊन शासनाने जमीनदोस्त केली. याबद्दल खंत व्यक्त करत बाबासाहेब पुरंदरेंनी कडवट टीका केली. वखार पाडायला नको होती, असे मत त्यांनी व्यक्त केले.
स्वराज्याच्या लढ्यात राजापूरचे योगदान मोलाचे राहिले. प्रतापगडावर अफझलखानाचा वध केल्यानंतर महाराज स्वस्थ बसले नाहीत, तर त्यांनी गोमंतक ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरु केल्या. त्याची तयारी राजापुरातच झाली होती. इथे राजांची फौज तैनात ठेवण्यात आली होती. अशा या राजापूरला हृदयस्पर्शी इतिहास आहे.
अनेक वर्षांची शिव चरित्र्याची तपश्चर्या सर्वजण अनुभवत होते. या चरित्राचा बोध घ्या व आचरण करा. विझलेल्या निखाऱ्याप्रमाणे न राहता धगधगत्या राखेतील निखाऱ्याप्रमाणे जीवन जगा, तरच तुम्हाला शिवचरित्र खऱ्या अर्थाने कळले, असा त्याचा अर्थ होईल, असा उपदेश करुन पुरंदरेंनी आपले व्याख्यान संपवले. (प्रतिनिधी)
पुरंदरे उवाच
राजापूरच्याच भूमीत बाळाजी आवजी चित्रे यांच्यासारखा हिरा राजांना लाभला.
जीर्णावस्थेतील वखार पाडणे ही मोठी चूक होती.
इंग्रजांना अद्दल घडवण्यासाठी राजापूरची वखार महाराजांच्या आदेशानुसार लुटली गेली.
राजापूरला हृदयस्पर्शी इतिहास.