वैभववाडीत ढगफुटीसदृश पाऊस, शहरात पाणीच पाणी
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 6, 2022 21:01 IST2022-09-06T20:57:55+5:302022-09-06T21:01:39+5:30
तासभर झालेल्या धुवाधार पावसामुळे शहरातील सखलभाग जलमय झाला.

वैभववाडीत ढगफुटीसदृश पाऊस, शहरात पाणीच पाणी
वैभववाडी (सिंधुदुर्ग ) : वैभववाडी शहर परिसरात विजांच्या कडकडाटासह मंगळवारी सायंकाळी ढगफुटीसदृश पाऊस झाला. तासभर झालेल्या धुवाधार पावसामुळे शहरातील सखलभाग जलमय झाला. दरम्यान, संभाजी चौकासमोर तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या गटाराचा पावसाच्या पाण्यामुळे अंदाज न आल्याने एक कार गटारात अडकली.
सकाळपासून तालुक्यात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी साडेतीन वाजल्यापासून वैभववाडी शहर परिसरात ढगफुटीसदृश पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटांसह झालेल्या या पावसाने शहरात दाणादाण उडाली. शहरात सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. संभाजी चौकालगत तर रस्त्यावरही पाणी साचले होते. नारायण वडापाव सेंटरनजीक मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पाण्याचा निचरा देखील होत नसल्यामुळे बराच वेळ पाणी साचून राहिले होते.
याशिवाय संभाजी चौकानजीक गटारात पावसाच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एका कार गटारात अडकली. बराच वेळ ती कार गटारात अडकून होती. या ठिकाणी गटारात गाडी जाण्याचा महिनाभरातील हा तिसरा प्रकार आहे. सह्याद्री पट्ट्यातही दमदार पाऊस झाला. या पावसामुळे नदीनाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.
प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टी
येथील संभाजी चौकासमोर पश्चिमेस तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गालगत पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार खोदलेले आहे. मात्र, पाण्याचा निचरा होत नसल्याने तेथे मोठे डबके तयार झाले आहे. त्यामध्ये वारंवार वाहने अडकण्याच्या घटना घडत आहेत. तरीसुद्धा नगरपंचायत किंवा महामार्ग प्राधिकरण याकडे लक्ष द्यायला तयार नाही.