दीपक केसरकर यांच्यासह पाच जणांविरोधात जनहित याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 16:58 IST2019-10-10T16:57:15+5:302019-10-10T16:58:07+5:30
बांदा सीमा तपासणी नाक्याची जागा अन्य कारणासाठी वापरली जात असल्याच्या कारणावरून बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह पाचजणांच्या विरोधात राष्ट्रीय हरित लवादाकडे बुधवारी जनहित याचिका दाखल केली आहे. या संबंधितांना त्या ठिकाणी प्रवेश देण्यास येऊ नये, उत्खनन व झाडतोडीची परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे.

दीपक केसरकर यांच्यासह पाच जणांविरोधात जनहित याचिका
सावंतवाडी : बांदा सीमा तपासणी नाक्याची जागा अन्य कारणासाठी वापरली जात असल्याच्या कारणावरून बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह पाचजणांच्या विरोधात राष्ट्रीय हरित लवादाकडे जनहित याचिका दाखल केली आहे. या संबंधितांना त्या ठिकाणी प्रवेश देण्यास येऊ नये, उत्खनन व झाडतोडीची परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे.
यात केसरकर यांच्यासह महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता, जिल्हाधिकारी परिवहन आयुक्त, राष्ट्रीय महामार्ग अभियंता व रस्ते विकास महामंडळाचे अभियंता यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याबाबतची माहिती याचिका दाखल झाल्यानंतर कल्याणकर यांनी दिली.
ते म्हणाले, बांदा सीमा तपासणी नाकासाठी तब्बल ३२ एकर जागा घेण्यात आली होती. त्यातील दहा हजार चौरस मीटर जागा दबाव आणून पालकमंत्री केसरकर यांनी येथील एका स्थानिक उद्योगपतीला टुरिस्ट सेंटर उभारण्यासाठी मोफत दिली. या कामासाठी ३ कोटी ९८ लाख रुपये शासकीय निधी मंजूर केला. त्यामुळे हा सर्व प्रकार म्हणजे जमीन मालकावर अन्याय करणारा आहे. तसेच ज्या गोष्टींसाठी जागा घेतली तो उद्देश साध्य होत नाही.
परिणामी ही जागा परत देण्यात यावी. तसेच जोपर्यंत या गोष्टींची पूर्तता होत नाही, तोपर्यंत संबधितांना त्या ठिकाणी प्रवेश करण्यात येऊ नये. तसेच उत्खनन व झाड तोडण्याची परवानगी देण्यात येऊ नये, असे या याचिकेत म्हटले आहे.