पुतळा तुडवून नोंदविला निषेध, शिवसैनिक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 17:03 IST2020-08-10T17:01:44+5:302020-08-10T17:03:43+5:30
बेळगावमधील मनगुत्ती या गावामध्ये असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला आहे. मालवण तालुका शिवसेनेकडून कर्नाटक शासनाचा जाहीर निषेध म्हणून कर्नाटक शासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्यास शिवसेना स्टाईलने तुडवून निषेध व्यक्त करण्यात आला.

मालवण येथे कर्नाटक सरकारचा प्रतीकात्मक पुतळा तुडवून निषेध व्यक्त करण्यात आला.
मालवण : कर्नाटक राज्यातील बेळगावमधील मनगुत्ती या गावामध्ये असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने काढून टाकून समस्त महाराष्ट्र वासीयांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला आहे.
याप्रकरणी मालवण तालुका शिवसेनेकडून कर्नाटक शासनाचा जाहीर निषेध म्हणून कर्नाटक शासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्यास शिवसेना स्टाईलने तुडवून निषेध व्यक्त करण्यात आला.
तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी कर्नाटक शासनाने काढून टाकलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा सन्मानाने त्याठिकाणी बसवून संपूर्ण शिवभक्तांची व महाराष्ट्रवासीयांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली.
यासोबत उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, नगरसेवक नितीन वाळके, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनीही कर्नाटक शासनाचा निषेध नोंदविला व समस्त शिवसैनिकांची निषेधाची भूमिका कर्नाटक शासनापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून पोहोचवू असे स्पष्ट करण्यात आले.
यावेळी नगरसेवक यतीन खोत, पंकज सादये, सेजल परब, तृप्ती मयेकर, सुनीता जाधव, शहरप्रमुख बाबी जोगी, गणेश कुडाळकर, अनंत पाटकर, आतू फर्नांडिस, तपस्वी मयेकर, भाई कासवकर, गौरव वेर्लेकर, यशवंत गावकर, बंड्या सरमळकर, नरेश हुले, दीपा शिंदे, निलम शिंदे, किरण वाळके, राजू परब, प्रवीण रेवंडकर, रवी तळाशिलकर, विद्या फर्नांडिस, भूषण कासवकर, विशाल सरमळकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते निषेध व्यक्त करण्यास उपस्थित होते.