मच्छिमार हक्कांचे रक्षण हव
By Admin | Updated: January 29, 2015 00:10 IST2015-01-28T22:13:53+5:302015-01-29T00:10:39+5:30
भाई वैद्य : मालवणात साथी किशोर पवार स्मृती पुरस्काराचे वितरणे

मच्छिमार हक्कांचे रक्षण हव
मालवण : कल्याणकारी राज्य आज शिल्लक राहिलेले नसून कारखानदारांचे कल्याण करणारे राज्य बनले आहे. एकीकडे पर्यावरण आणि जैवविविधता वाचविली जात असताना नैसर्गिक साधन संपत्तीवर उपजीविका करणाऱ्या मच्छिमारांच्या हक्कांचे रक्षण झाले पाहिजे. यासाठी न्याय मार्गाने वैचारिक लढा सुरुच ठेवला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांनी मालवण येथील साथी किशोर पवार स्मृती पुरस्कार वितरणप्रसंगी केले.एस. एम. जोशी सोशालिस्ट फाऊंडेशन आणि बॅ. नाथ पै सेवांगण यांच्यावतीने साथी किशोर पवार स्मृती समारंभाचे आयोजन मामा वरेरकर नाट्यगृह येथे करण्यात आले होते. कामगार कायद्याची मोडतोड करुन कारखानदारांना अधिकाधिक सवलती देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अमेरिका सांगते म्हणून आपण जागतिकिकरण करणे चुकीचे ठरेल. असेही वैद्य यांनी सांगितले. सरकारचे आर्थिक धोरण सर्वसामान्यांच्या हिताच्या आड येत असेल तर त्याविरुद्ध लढा दिलाच पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमार शेतकऱ्यांना अनेक प्रश्नावर लढावे लागत आहे. विचारांचा लढा असाच सुरु ठेवा. असे आवाहनही भाई वैद्य यांनी केले.यावेळी साहित्यिक प्रविण बांदेकर, माजी आमदार जयानंद मठकर, एस. एम. जोशी, सोशालिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष मधुकर पाटील, सचिव सुभाष वारे, रमेश धुरी, छोटू सावजी, रवीकिरण तोरसकर यांच्यासह मच्छिमार मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
धरणे आंदोलन छेडणार : पौर्णिमा मेहेर
पौर्णिमा मेहेर म्हणाल्या, मत्स्य व्यवसायात महिलांचे योगदान मोठे आहे. याची कोठेही नोंद होत नाही. अशा महिलांना आधाराची गरज आहे. तारापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांना ३५ वर्ष झाली तरीही न्याय मिळाला नाही. देशाला ऊर्जेचा प्रश्न असला तरीही या प्रकल्पग्रस्तांनी परिणाम सोसले आहेत. नियमावली तयार करण्यात आली असली तरीही त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. जैतापूरचा प्रश्नही असाच आहे. अच्छे दिनांमध्ये असे प्रश्न समाविष्ट असतील तर मच्छिमारांनी ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे. मच्छिमारांच्या प्रश्नासाठी मार्च महिन्यात नॅशनल फिश वर्कर्स फोरमच्यावतीने धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या.
५८ टक्के शेतकऱ्यांचे काय करणार?
सत्ताधाऱ्यांना आपला देश अमेरिकेच्या दावणीला बांधायचा आहे. याच विचाराने सत्ताधारी पछाडले आहेत. त्यांना कष्टकरी शेतकऱ्यांची पर्वा नाही. अमेरिकेत केवळ २ टक्केच शेतकरी आहेत. भारतात ही संख्या ६0 टक्के आहे. तेथील लोकसंख्या ३0 कोटी तर भारताची लोकसंख्या १00 कोटींहून अधिक आहे. यामुळे भारताची तुलना अमेरिकेशी करताना येथील शेतकऱ्यांची संख्या २ टक्क्यांवर आणणार का? उर्वरित ५८ टक्के शेतकऱ्यांचे काय करणार?
- भाई वैद्य,
ज्येष्ठ समाजवादी विचारवंत