स्कुबा डायव्हिंग सेंटरवर ग्रामस्थांचा निषेध मोर्चा

By Admin | Updated: January 29, 2015 00:09 IST2015-01-28T22:22:31+5:302015-01-29T00:09:32+5:30

अधिकाऱ्यांची पाठ

The Prohibition of Villages in the Scuba Diving Center | स्कुबा डायव्हिंग सेंटरवर ग्रामस्थांचा निषेध मोर्चा

स्कुबा डायव्हिंग सेंटरवर ग्रामस्थांचा निषेध मोर्चा

मालवण : महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्यावतीने उभारण्यात आलेल्या स्कुबा डायव्हिंग सेंटरच्या नामांतर वादाच्या पार्श्वभूमीवर स्कुबा डायव्हिंग सेंटरवर तारकर्ली गावाचे नाव असावे, या मागणीसाठी बुधवारी तारकर्ली ग्रामस्थ एकवटले. यावेळी स्कुबा डायव्हिंग सेंटरवर तारकर्ली ग्रामस्थांनी निषेध मोर्चा काढला.महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्यावतीने तारकर्ली मध्यवर्ती आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायव्हिंग सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटन २९ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार होते. मात्र या वादामुळे उद्घाटन रद्द झाल्याची चर्चा तारकर्ली परिसरात सुरू होती.
स्कुबा डायव्हिंग सेंटरची इमारत अनधिकृत असून अशा अनधिकृत इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असेल तर याला आपला विरोध असल्याची भूमिका तारकर्ली ग्रामस्थांनी मंगळवारी विशेष सभेत घेतली. शिवाय महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या मनमानी कारभाराविरोधात जाब विचारण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यानुसार तारकर्ली ग्रामस्थांनी बुधवारी स्कुबा डायव्हिंग सेंटरवर निषेध मोर्चा काढला. नामांतराबाबत प्रांताधिकारी, तहसीलदार हे निर्णय घेऊ शकले नाहीत. सेंटरच्या नामफलकावरून तारकर्लीचे नाव महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी गायब केले यामुळे या अधिकाऱ्यांना निलंबन करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. स्कुबा डायव्हिंग सेंटरचे भूमिपूजन तत्कालिन महसूलमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले होते. यावेळी तारकर्ली नावाची पाटी होती, त्याची चौकशी व्हावी.तारकर्ली नावाच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने आता तारकर्ली गावाचे नाव असावे, अशी आपली ठाम भूमिका आहे. जोपर्यंत तारकर्ली नाव लागत नाही तोपर्यंत इमारतीचे उद्घाटन होऊ देणार नाही. कोणीही मंत्री आला तर त्यांना काळे झेंडे दाखवू, असा निर्णय घेण्यात
आला. (प्रतिनिधी)

अधिकाऱ्यांची पाठ
स्कुबा डायव्हिंग सेंटरच्या इमारतीला तारकर्ली नाव असावे. तारकर्ली नाव हटविणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी बुधवारी तारकर्ली ग्रामस्थांनी सेंटर येथे निषेध मोर्चा नेला. प्रवेशद्वारावर ठिय्या केला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अर्धा तास ग्रामस्थांनी महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या अधिकाऱ्यांची वाट पाहिली, मात्र अधिकाऱ्यांनी मोर्चाची कोणतीही दखल घेतली नाही. ग्रामस्थांनी वाट पाहून माघार घेतली.

Web Title: The Prohibition of Villages in the Scuba Diving Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.