विघ्नहर्त्याच्या स्वागताची तयारी सुरू, गणेशमूर्ती शाळा गजबजल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 13:52 IST2020-08-18T13:48:23+5:302020-08-18T13:52:31+5:30

कोरोनासारख्या महामारीचे विघ्न समोर असतानाही विघ्नहर्त्याच्या पूजनासाठी आकर्षक व सुबक गणेशमूर्ती बनविण्यात सर्व मूर्तिकार गुंतले आहेत. विघ्न कितीही मोठे असले तरी विघ्नहर्त्याचे पूजन हे होणारच अशा भावनेने गणेशभक्तांनीही घरोघरी गणपतीच्या स्वागताची तयारी सुरू केली आहे.

Preparations for Ganpati's reception started, Ganeshmurti schools were abuzz | विघ्नहर्त्याच्या स्वागताची तयारी सुरू, गणेशमूर्ती शाळा गजबजल्या

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे गणपती शाळेत लगबग सुरू झाली आहे.

ठळक मुद्देगणपतीच्या स्वागताची तयारी सुरू, गणेशमूर्ती शाळा गजबजल्या मूर्तीकारांची लगबग, सणाची पूर्वतयारी, जिल्ह्यात भक्तिभाव, उत्साहपूर्ण वातावरण

प्रथमेश गुरव 

वेंगुर्ला : कोरोनासारख्या महामारीचे विघ्न समोर असतानाही विघ्नहर्त्याच्या पूजनासाठी आकर्षक व सुबक गणेशमूर्ती बनविण्यात सर्व मूर्तिकार गुंतले आहेत. विघ्न कितीही मोठे असले तरी विघ्नहर्त्याचे पूजन हे होणारच अशा भावनेने गणेशभक्तांनीही घरोघरी गणपतीच्या स्वागताची तयारी सुरू केली आहे.

गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण आहे. यानिमित्ताने घराबाहेर असलेले सर्वजण एकत्र येऊन हा सण मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्याची रितच प्रत्येक घरात पहायला मिळते. यावर्षी कोरोनारुपी विघ्न या सणासमोर उभे ठाकले आहे. गणेश चतुर्थी सणाची पूर्वतयारी ही सर्व मूर्तीशाळांमध्ये गणेशमूर्ती घडविण्यापासून सुरू होते. तशी यावर्षीही ती सुरू झाली. परंपरेप्रमाणे भक्तमंडळींनी आपापल्या गणपतीचे पाट दिल्यानंतर त्यावर गणपतीही बनविण्यात आले आहेत.

दरम्यान, अवघ्या दहा दिवसांवर गणेश चतुर्थी येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला तालुक्यासह शहरांमधील मूर्तीशाळांमध्ये धावपळ दिसून येत आहे. काही शाळांमध्ये एकाबाजूला गणपतीचे मातीकाम सुरू आहे तर एका बाजूला गणपती रंगविण्यास सुरुवात झाली आहे. मोठमोठ्या शाळांमध्ये गणपतीची रेखणीही झाली आहे. काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. यात विजेचाही खेळखंडोबा झाला. पण गणेशमूर्तीचे काम न थांबवता अशाही परिस्थितीत काम सुरू राहिले.

गणपतीच्या स्वागतासाठी सर्व घर अगदी उजळून निघण्यासाठी वेळ मिळेल तसा घराघरांमध्ये साफसफाईच्या कामांना सुरुवात झाली आहे. यावर्षी संपूर्ण घर जरी रंगविणे शक्य नसले तरी निदान गणपती पूजनाची खोली तरी सुशोभित असावी या हेतूने काही ठिकाणी रंग काढण्याची कामे सुरू आहेत. तसेच गणेशोत्सव कालावधीत लागणारी प्रत्येक वस्तू आठवणीने घरी आणली जात आहे. तसेच गणपतीची आरास कशी जास्त सजविता येईल यादृष्टीने लक्ष देत आहेत.

गणेशमूर्ती उंचीत बदल : खबरदारीच्या सूचना

गणेश चतुर्थी म्हटली की स्वत:चा गणपती हा इतर गणपतींपेक्षा वेगळा हवाच. आकर्षक रंग, खडे, हिरे, दागदागिन्यांनी मढवलेला असो किंवा गणपतीची उंची असो, असा हट्टच या भक्तांमध्ये दिसून येतो. यावर्षी मात्र, गणपतीच्या उंचीवर परिणाम झाला आहे. सुमारे ७ ते ८ फूट उंची असलेल्या गणपतीची उंची यावेळी २ ते ४ फुटांवर आली आहे. त्यामुळे उत्तरोत्तर गणपतीची उंची वाढविणाऱ्या किंवा त्यांच्या परंपरेनुसार दरवर्षी ठरावीक मोठ्या उंचीच्या गणपतीचे पूजन करणाऱ्या भक्तमंडळींतून नाराजी दिसून येत आहे.

पूजापाठ करताना सर्रासपणे कापूर किंवा धूप जाळून धार्मिक वातावरण निर्मिती केली जाते. त्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिसर निर्जंतुकीकरण करण्यासाठी कापूर आणि धूप यांचाच वापर होत आहे. इतर खबरदारींबरोबरच कापूर आणि धूपाचे महत्त्व समजल्याने त्याचा वापर प्राधान्याने होणार असल्याने कोरोना विषाणूच्या भीतीची तीव्रता कमी झाली आहे. एकंदरच कोरोनामुळे सर्वांचा उत्साहच मावळला आहे.
 

ऋण काढून गणेश चतुर्थीचा सण साजरा करणारा गणेशभक्त यावेळी मात्र, कोरोना रोगाच्या भीतीखाली सण साजरा करीत आहे. दरवर्षी अमूकच गणपती हवा असा हट्ट धरणाऱ्या भक्तांनी यावर्षी साधेच गणपती सांगितले आहेत. अशा परिस्थितीत आम्हीही आपल्यापरीने जास्तीत जास्त आकर्षक गणपती कसे दिसतील याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. कारण, शाळेतून गणपती घरी घेऊन जाताना भक्तांच्या चेहऱ्यावर असणारे समाधान आम्हांला पहायचे आहे.
- सुदर्शन कुडपकर,
ज्येष्ठ गणेश मूर्तीकार (भटवाडी)


जुन्या रितीरिवाजानुसार दरवर्षी आमच्याकडे साधारण ६ फूट उंची असलेल्या भव्यदिव्य अशा गणेशमूर्तीचे पूजन करतो. सालाबाद ११ दिवस असला तरी अंगारकी संकष्टी आल्यास किंवा अन्य हेतूप्रित्यर्थ १७ किंवा २१ दिवसांपर्यंत आम्ही गणपतीची भक्तिभावाने सेवा करतो. यावर्षी मात्र, कोरोनामुळे गणेश मूर्तीची उंची ४ फुटांवर आणली आहे. उंची कमी करणे हे आम्हांला जरी पसंत नसले तरी शासनाच्या नियमांचे व अटींचे पालन करणे हे आमचे कर्तव्य आहे.
- रेडकर बंधू,
राऊळवाडा

 

 

Web Title: Preparations for Ganpati's reception started, Ganeshmurti schools were abuzz

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.