राजकीय पक्षांची विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी
By Admin | Updated: August 18, 2014 23:32 IST2014-08-18T22:50:32+5:302014-08-18T23:32:45+5:30
आंदोलनांचा फार्स

राजकीय पक्षांची विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी
मिलिंद पारकर -कणकवली --विधानसभा निवडणुक जशी जवळ येत आहे तशी विरोधकांकडून रणनीतिचा भाग म्हणून छोट्या-मोठ्या आंदोलनांमधून लोकांच्या मनात उतरण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवसेना, भाजपाकडून मॅरेथॉन आंदोलने करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. या आंदोलनातून आश्वासनांची गाजरे दाखवण्यात आली. आंदोलनांचे हे सत्र काही कालावधी सुरू राहण्याची चिन्हे आहेत.
बांधकाम विभाग, बीएसएनएल, वीज कंपनी, नगरपंचायत अशी टारगेट या आंदोलनांसाठी निवडण्यात येत आहेत. बीएसएनएलच्या बाबतीत गेले काही महिने अनेक तक्रारी निर्माण झाल्या आहेत. ठोस उपाययोजनाच होत नसल्याने आश्वासनांशिवाय काही केले जात नाही. बीएसएनएलला अधिकाऱ्यांना घेराओ घालून शिवसेनेच्या तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांनी जाब विचारल्याचे आंदोलन फार्स ठरला. अशाच प्रकारे वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे नगरपंचायतीसाठी कायमस्वरूपी तंत्रज्ञ देण्याची मागणी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून सावडाव धरणाकडे जाणारा रस्ता व तेथील संकुलाच्या बांधकामाबाबत आवाज उठवण्यात आला. मात्र, जिल्हा परिषद बांधकाम आणि सार्वजनिक बांधकाम दोन्ही विभागांकडून नियमावर बोट ठेवण्यात आल्याने काहीच निष्पन्न झाले नाही. निकृष्ट काम आणि रस्त्यांशेजारी सुयोग्य गटारांचे बांधकाम नसल्याने शहरासह तालुक्यातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. मात्र, हे खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा परिषद बांधकामकडे निधी नसल्याने खड्डे कसे बुजवायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. गणेश चतुर्थीपूर्वी येनकेनप्रकारे खड्डे बुजवण्याची प्रथा आहे. शहरातील खड्डे गणेश चतुर्थीपूर्वी बुजवण्याचे आश्वासन नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत देण्यात आले. कणकवली विधानसभा मतदारसंघातून नितेश राणे यांच्या नावाची चर्चा नारायण राणे यांनी घडवून आणली. मात्र, कॉँग्रेसचेच आमदार विजय सावंत यांनी आपला दावा या मतदारसंघावर केला आहे. यावरून दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस वगळता इतर पक्षांनी आपापली संघटना बांधणीची कामे हाती घेतल्याचे दिसत आहेत. पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करून संघटना बांधणीचे काम सुरू झाले आहे. आचरा मार्गाला बायपास होणाऱ्या मार्गासाठी कणकवली बसस्थानकानजीक टपाल खात्याकडील जमिन देण्यास सहमती झाली. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याने आचरा बायपास मार्गाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कणकवली शहरात सुरू झालेल्या वाय-फाय सेवेचा बराच गाजावाजा झाला. वायफाय सेवेबद्दल युवकांच्या मनात मोठी उत्सुकता होती. मात्र, शहरात सर्वच ठिकाणी न मिळता शहरातील काही पॉकेटमध्ये ही सेवा मिळत आहे. साकेडीतील १४ जणांना तापसरी अतिसाराने गाठल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली.
वार्तापत्र
कणकवली