Postpone action till Ganesh Chaturthi, Tehsildar's letter to the municipality | गणेश चतुर्थीपर्यंत कारवाई स्थगित करा, तहसीलदारांचे नगरपालिकेला पत्र

संत गाडगेबाबा भाजी मंडईतील कारवाईविरोधात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची भेट घेत निवेदन दिले. यावेळी पुंडलिक दळवी, उदय भोसले, सुरेश गवस, सत्यजित धारणकर, रंजना निर्मल आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देशिवसेनेची बैठक, जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार राष्ट्रवादीने घेतली तहसीलदारांची भेट

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिकेने चार दिवसांपूर्वी भाजी विक्रेत्यांना संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या बाहेरून हलविल्याने या विरोधात महाविकास आघाडीने आंदोलन केले होते. त्यानंतर तहसीलदारांनी या भाजी विक्रेत्या महिलांची कैफियत ऐकून घेतली होती. त्यानंतर तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी नगरपालिकेला तातडीचे पत्र काढत गणेश चतुर्थीपर्यंत या भाजी विक्रेत्यांना जशास तसे ठेवण्याबाबत सांगितले आहे.

 शिवसेनेचे पदाधिकारीही लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कारवाईची मागणी करणार आहेत. याबाबतची बैठक जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. तसेच राष्ट्रवादीनेही स्टॉल हटाव मोहिम तत्काळ थांबवा, अशी मागणी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे निवेदन देत केली आहे.

सावंंतवाडी नगरपालिकेने चार दिवसापूर्वी संत गाडगेबाबा भाजी मंडईच्यासमोर बसत असलेल्या स्थानिक महिला भाजी विक्रेत्यांना हटविले होते. त्यांना पर्यायी जागा म्हणून गाडगेबाबा भाजी मंडईच्या आत बसवले होते. पण तेथे त्यांचा व्यवसाय होत नसल्याने विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. ही नाराजी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसमोर उफाळून आली होती.

यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनाही या भाजी मंडईमध्ये बोलवून घेत विक्रेत्या महिलांची कैफियत ऐकून घेण्याची विनंती केली होती. त्याप्रमाणे त्यांनी सर्वांची कैफियत ऐकून घेतली. 

आज तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी नगरपालिकेला एक पत्र लिहले असून, सध्या कोरोनाचा काळ आहे. अशा स्थितीत फिरत्या महिला विक्रेत्यांना हटवणे योग्य नसून गणेश चतुर्थीच्या तोंडावर अशी कारवाई केली आहे, ती पूर्ववत करत या भाजी विक्रेत्या महिलांना त्यांच्या पूर्वीच्याच जागेवर बसवा अशी सूचना केली आहे.

दरम्यान, या कारवाईला विरोध म्हणून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार म्हात्रे यांची भेट घेतली. यावेळी स्टॉल हटाव मोहिमेला तत्काळ स्थगिती देऊन पूर्ववत जागा द्या, अशी मागणी येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे केली आहे.

कोरोना आजाराच्या काळात सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवून विक्रेत्यांना चुकीच्या पद्धतीने बसवले जात आहे. त्यामुळे भविष्यात आजार पसरण्याची भीती आहे. त्यामुळे तत्काळ याबाबत योग्य ती दखल घ्यावी, असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी पुंडलिक दळवी, उदय भोसले, सुरेश गवस, सत्यजीत धारणकर, अशोक पवार, विजय कदम, रंजना निर्मल, गुरुदत्त कामत, संतोष तळवणेकर, आर्यन रेड्डीज, आॅगस्तीन फर्नांडिस, तुषार भोसले, विलास पावसकर, हीदायतुल्ला खान आदी उपस्थित होते.

विक्रेत्यांच्या पाठीशी

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचीही येथील केसरकर यांच्या कार्यालयात जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत पदाधिकारी तसेच नगरसेवकही उपस्थित होते. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी नगरसेवकांना घेऊन आपण जिल्हाधिकारी यांची भेट घेऊया असे स्पष्ट केले. तसेच कारवाई विरोधात स्थानिक भाजी विक्रेत्यांच्या पाठशी ठाम पणे उभे रहण्याचे ही ठरवले आहे.


 

Web Title: Postpone action till Ganesh Chaturthi, Tehsildar's letter to the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.