Positive Role in Rural Development Required: Atul Rawarane | ग्रामविकासात सकारात्मक भूमिका आवश्यक  : अतुल रावराणे

ग्रामविकासात सकारात्मक भूमिका आवश्यक  : अतुल रावराणे

ठळक मुद्देग्रामविकासात सकारात्मक भूमिका आवश्यक  : अतुल रावराणेस्वखर्चाने सभामंडपाची उभारणी, सभामंडपाचे लोकार्पण

वैभववाडी : निवडणुकीपुरते राजकारण असते. त्यानंतर गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येकाने सकारात्मक भूमिका ठेवणे आवश्यक आहे. आपल्या गावाला शासनाकडून अधिकाधिक निधी कसा मिळेल यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. तरच गावाचा सर्वांगीण विकास साधला जाऊ शकतो, असे मत शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी गडमठ येथे व्यक्त केले.

गडमठ येथील गांगेश्वर मंदिरालगत भैरीभवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अतुल रावराणे यांनी स्वखर्चाने सभामंडपाची उभारणी केली असून या सभामंडपाचे लोकार्पण रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके, पंचायत समिती सदस्य लक्ष्मण रावराणे, दीपक पाचकुडे, महेश रावराणे, रामचंद्र सुतार, उन्नती पावले, विकास मठकर, पप्पू दळवी आदी उपस्थित होते.

रावराणे म्हणाले, ग्रामविकासाला चालना देण्यासाठी गावातील एकोपा महत्त्वाचा असतो. ही एकजूट ठेवण्याचे काम गावच्या ग्रामदैवतांच्या माध्यमातून शक्य होते. एकीच्या बळावरच शासनाकडून अधिकाधिक विकासनिधी गावात कसा आणता येईल? हे सकारात्मक धोरण प्रत्येकाने जपणे आवश्यक आहे. अध्यात्म ही आपली संस्कृती आहे. ती टिकविण्यावर आपला भर असणे आवश्यक आहे.

त्याचबरोबर पुढच्या पिढीला चांगले शिक्षण गावातच कशा पध्दतीने उपलब्ध करून देता येईल? याचाही विचार आपण केला पाहिजे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना गावातच संगणकाचे प्राथमिक ज्ञान मिळणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी रावराणे यांच्यासह इतर मान्यवरांचा शाल, श्रीफळ देऊन गावाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

 

Web Title: Positive Role in Rural Development Required: Atul Rawarane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.