पोलिसच प्रात:विधीसाठी उघड्यावर
By Admin | Updated: October 1, 2015 22:39 IST2015-10-01T22:39:14+5:302015-10-01T22:39:14+5:30
दोडामार्गातील वीजघर नाक्यावरील प्रकार : प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगणारे उदाहरण--लोकमत विशेष

पोलिसच प्रात:विधीसाठी उघड्यावर
गजानन बोंद्रे -साटेली भेडशी -शासन एकीकडे निर्मल ग्रामसाठी अविरत झटत आहे. गावोगावी आणि घरोघरी स्वच्छतेचा मंत्र दिला जात आहे. उघड्यावर शौचालयास जाण्यास दंडात्मक कारवाईही करण्यात येत आहे. पण शासनाचे सेवक अणि जनतेचे संरक्षक म्हणून ओळखले जाणारे पोलीस कर्मचारीच जर उघड्यावर प्रात:विधीसाठी (शौचालयास) जात असतील तर काय म्हणावे? पण हे गंभीर वास्तव आहे दोडामार्ग तालुक्यातील वीजघर येथील तपासणी नाक्यावरचे. सिंधुदुर्ग-कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमारेषेवर असणाऱ्या या तपासणी नाक्याच्या इमारतीची अत्यंत दुरवस्था झाली आहे. चारी बाजूंनी पावसाळ्यात लागलेली गळतीची समस्या आणि मुलभूत सोयी सुविधा अभावी या निवासाला अखेरची घरघर लागली आहे. येथे शौचालयाची सोय तर नाहीच शिवाय पाण्याचीही सोय नाही. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांची अवस्था ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ अशी झाली आहे.
वीजघर (केंद्रे पुनर्वसन) येथील पोेलीस तपासणी नाका सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमारेषेवरील महत्वाचा तपासणी नाका आहे. या मार्गावरील अवैध वाहतूक, संशयास्पद मालाची वाहतूक, चोरट्या दारूची वाहतूक आदी गैरप्रकाराला आळा घालण्याचे काम यातून चांगल्या प्रकारे करण्यात आले. वरिष्ठांनी अनेकवेळा याबाबत स्तुती सुमनेही उधळली आहेत. त्यामुळे या नाक्याला पोलीस प्रशासनाला महत्वाचे स्थान आहे. पण या नाक्यावरच्या निवास खोलीची मात्र वाईट अवस्था झाली आहे.
वीजघर येथील पोलीस चौकीच्या इमारतीतून पावसाळ्यात छपराच्या आतून चारी बाजूंनी पाणी पडत असल्याने त्यांची डोकेदुखी वाढत आहे. शिवाय येथे कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे सेवा बजावणाऱ्या पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या चौकीवरच्या कर्मचाऱ्यांसाठी शौचालयाची व्यवस्था नसल्याने हे कर्मचारी उघड्यावरच शौचास जातात. शिवाय येथे साधी पाण्याची सुद्धा सोय नाही. त्यामुळे उघड्यावर शौचास जातानाही पाण्याच्या शोध घेऊनच त्यांना जावे लागते. हे भीषण वास्तव असतानाही कुणीही वरीष्ठ अधिकारी या कर्मचाऱ्यांच्या आवश्यक सोयींसाठी प्रयत्न करताना दिसत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
पावले उचलणे गरजेचे
या चौकीचा परिसर दाट जंगलाचा असल्याने येथे दिवसाढवळ्याही वन्यप्राण्यांचा वावर असतो. त्यामुळे या चौकीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करून तशी कार्यवाही आणि सुविधा निर्माण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पावले उचलण्याची गरज आहे.
कर्मचाऱ्यांची कुचंबणा
उघड्यावर शौचास जाताना एका बाजूने रोग पसरण्याचा धोका वाढतोच पण दुसऱ्या बाजूने चौकीच्या आसपासचा सर्व परिसर दाट जंगलाचा असल्याने कर्मचाऱ्यांच्या जीवितांच्यादृष्टीने वन्य प्राण्यांपासूनचा धोकाही संभवतो. आरोग्य विभागाच्या सुचनांचे पालन करणे आवश्यक असतानाही केवळ गरज म्हणून उघड्यावर शौचालयास जाणाऱ्या या कर्मचाऱ्यांची कुचंबना अजून किती दिवस प्रशासन पाहत राहणार आहे, असा सवाल ग्रामस्थांसह मार्गावरील वाहनधारकांतून होत आहे. तर या शासकीय कर्मचारीच अशा अस्वच्छ प्रसंगांना सामोरे जात असतील तर सर्वसामान्यांनी काय बोध घ्यावा? या प्रश्नाचेही उत्तरही प्रशासनाला द्यावे लागेल.