पोलिस कुटुंबियांची पाण्यासाठी धडपड

By admin | Published: November 4, 2016 12:22 AM2016-11-04T00:22:11+5:302016-11-04T00:22:11+5:30

मालवणातील समस्या : पोलिस-मुख्याधिकारी यांच्यात बाचाबाची, तहसीलदारांकडे मांडली कैफियत

The police family struggled for water | पोलिस कुटुंबियांची पाण्यासाठी धडपड

पोलिस कुटुंबियांची पाण्यासाठी धडपड

Next

 
मालवण : पोलिस वसाहतीतील पाण्याची समस्या सोडविण्यात पालिकेचे लक्ष वेधूनही पालिका अपयशी ठरली आहे. याबाबत महिन्याच्या प्रदीर्घ अवधीनंतर पालिका प्रशासनाच्या विरोधात संतप्त बनलेल्या मालवण पोलिस व त्यांंच्या कुटुंबियांनी पुन्हा एकदा मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी पालिकेत धडक दिली. मात्र, आपल्याला निवडणुकीचे काम आहे, असे सांगून त्या तहसील कार्यालय येथे निघून गेल्या. त्यामुळे अधिकच आक्रमक बनलेल्या महिला पोलिस व कुटुंबियांनी पालिकेबाहेर ठिय्या मांडला. त्यांनतर पालिकेकडून ठोस भूमिका न आल्याने पोलिस कुटुंबियांनी तहसीलदार वीरधवल खाडे यांची भेट घेत महिनाभर पाणी नसल्याची कैफियत मांडली. यावेळी तहसीदार यांनी दोन दिवसांत पाण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
तहसील कार्यालयात पोलिसांनी धडक दिल्यानंतर नेहमी शांत असलेल्या मुख्याधिकारी यांनी थेट पोलिसांकडे बोट दाखवत पालिका प्रशासनाची बाजू झटकण्याचा प्रयत्न केला. पोलिस वसाहतीला पालिकेकडून पाणीपुरवठा सुरु आहे. आम्हांला पाणीपुरवठा हे एकच काम नसून निवडणुकीची कामे आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा होत असतानाही पोलिसांच्या अपेक्षा वाढू लागल्या आहेत, असे वादग्रस्त विधान मुख्याधिकारी रंजना गगे यांनी तहसीलदारांसमोर केले. याबाबत पोलिसांनी नाराजी व्यक्त करत पालिकेकडून पुरवठा केले जाणारे पाणी मुख्याधिकारी यांनी पिऊन दाखवावे, असे आव्हान केले.
पोलिसांची तहसीलदारांकडे कैफियत
पोलिस वसाहतीत महिनाभर पाणीपुरवठा होत नसल्याने पोलिस कुटुंबियांचे मोठे हाल झाले आहेत. पालिकेकडून तात्पुरत्या स्वरुपात देण्यात येणारे पाणी गढूळ असल्याने ते पिण्यायोग्य नाही.
याकडे पालिकेचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष केले जात आहे. पोलिस वसाहतीचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यास दिरंगाई करणाऱ्या पालिकेने तात्पुरते गढूळ पाणी देऊन पळवाट काढली आहे. वसाहतीत महिनाभर सुरु असलेला पाणीप्रश्न पालिकेकडून गांभिर्याने घेण्यात येत नसल्याचा आरोपही पोलिस कुटुंबियांनी केला.
यावेळी तहसीलदार खाडे यांनी पोलिसांचे म्हणणे ऐकून घेत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली. पोलिस कर्मचारी व कुटुंबियांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेता तहसीलदार खाडे यांनी पोलिसांशी काहीकाळ चर्चा केली.
संबंधितावर कारवाई का नाही?
मालवण पोलिस वसाहतीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पालिकेच्या संकुलाच्या वीज मीटरवरून या वसाहतीला नळपाणी योजनेचा पाणीपुरवठा होत होता. मात्र विहिरीवरून पाणी उपसा करणाऱ्या वीज पंपाचे बिल भरणा करण्याच्या प्रश्नावरून वीज वितरण व पालिका प्रशासन यांच्यात वाद निर्माण झाल्याने गेले २५ दिवस वसाहतीतील ३० ते ३५ कुटुंबे पाणीटंचाईचा सामना करत आहेत. मुख्याधिकारी रंजना गगे यांनी दोन दिवसांत पाणी प्रश्न सोडवू, असे आश्वासन देऊनही पाणी प्रश्न सुटला नाही. याबाबत पालिका प्रशासन सबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यास टाळाटाळ का करते, असाही सवाल उपस्थित करण्यात आला. (प्रतिनिधी)
गृहराज्यमंत्री लक्ष देतील का?
मालवण पोलिस वसाहतीत गेले २५ दिवस पाणीपुरवठा खंडित आहे. पालिकेला वारंवार सांगूनही हा प्रश्न सुटला नाही. पोलिसांनी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना निवेदनाद्वारे व्यथा मांडताना तत्काळ प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे. त्यामुळे याची दखल घेत केसरकर पोलिसांना घरे देण्यापेक्षा मुलभूत समस्या मार्गी लावतील काय? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
४वसाहतीत पिण्याचे पाणी येत नसल्याने महिनाभर शांत बसलेला पोलिसांमधील ‘माणसा’चा उद्रेक झाला. पाणी पुरवठा सुरळीत न करता पर्यायी पाणी उपलब्ध करून पालिका आपली जबाबदारी झटकत आहे. हेच पाणी शहरात एक दिवस बंद ठेवले तरी नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. तत्काळ पाणीपुरवठा केला जातो. मात्र पोलिस वसाहतीत लक्ष वेधूनही २५ दिवस पाणी येत नाही म्हणजे पोलिस माणसे नाहीत का ?
अशा अनेक प्रश्नांची पोलिसांनी सरबत्ती गगे यांच्यावर केली. मात्र, या प्रश्नांना ठोस उत्तरे देऊ न शकल्याने तहसीलदार दालनातून मुख्याधिकारी गगे यांनी काढता पाय घेतला.
पहिली आंघोळ पाण्याविना!
पोलिस कुटुबियांचाही पारा यावेळी चांगलाच चढला होता. ऐन दिवाळीत उद्भवलेल्या पाण्याच्या समस्येवर पालिकेने तोडगा काढला नसल्याने दिवाळीची पहिली आंघोळ पाण्याविना करण्याची वेळही पोलिसांवर आली आहे.
कायदा-सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिस व त्यांच्या कुटुंबियांच्या भावनांचा आदर केला जात नाही. पाणी प्रश्नाबाबत पोलिस निरीक्षक अरविंद बोडके यांनीही गगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन कट केला. त्यामुळे पोलिसांच्या समस्येवर पालिका प्रशासनाला वेळ नाही, अशी खंत पोलिसांनी व्यक्त केली.
हा प्रश्न सोडविण्यासाठी पालिकेकडून अपेक्षित सहकार्य न मिळता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.
वसाहतीला गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने आवाज उठवून न्याय मिळत नसेल तर शुध्द पाणी पोलिसांनी प्यायचेच नाही का ? कायद्याने हात बांधले गेले असल्याने अन्याय सहन करावा लागत आहे, असे आरोप करण्यात आले.

Web Title: The police family struggled for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.