पोलीस वसाहतीची दुरवस्था
By Admin | Updated: August 18, 2014 21:35 IST2014-08-18T21:25:07+5:302014-08-18T21:35:03+5:30
खारेपाटणमधील समस्या : कर्मचाऱ्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न गंभीर

पोलीस वसाहतीची दुरवस्था
संतोष पाटणकर - खारेपाटण --रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या व पूर्वीच्या रत्नागिरी जिल्ह्यातील ब्रिटीशकालीन पोलीस वसाहत इमारतीची अक्षरश: दुर्दशा झाली आहे. सध्या ही इमारत शेवटची घटका मोजत आहे. मात्र यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचा निवासाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.
गेल्या दोन वर्षात खारेपाटण दशक्रोशीत लहान- मोठ्या चोरींच्या घटनेचे प्रकारदेखील वाढत आहेत. तसेच येथे स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, सिंधुदुर्ग मध्यवर्ती बँक, सहकारी सोसायटी, भालचंद्र नागरी सहकारी पतपेढी, महिला पतसंस्था आदी पत पुरविणाऱ्या संस्था, बँका असून गस्ती घालणाऱ्या पोलिसांचे पथक येथे कार्यरत असणे आवश्यक आहे. खारेपाटण ही ब्रिटीशकालीन बाजारपेठ असून इतिहासकालीन शहर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन पोलीस वसाहतीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.
खारेपाटण शहरात हिंदू- मुस्लीम, जैन, बौद्ध, गुजराती आदी समाजबांधव सलोख्याने राहत असून खारेपाटणचे पूर्वीचे प्रथम पोलीस पाटील शंकर शेटये यांनी पोलिसांना नेहमीच सहकार्य केले. तोच वारसा पुढे चालवत सध्याचे पोलीस पाटील चंद्रकांत शेटये तंटामुक्ती समितीच्या साहाय्याने चांगल्याप्रकारे पार पाडत आहेत.
नुकतीच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रानमोळे यांनी खारेपाटण पोलीस ठाण्याला भेट दिली होती. यावेळी ग्रामस्थांनी दक्षता कमिटी सभेमध्ये पोलीस वसाहतीबाबत माहिती दिली.मुख्य पोलीस ठाण्याची इमारत मात्र सुस्थितीत असून या इमारतीची दोनवेळा दुरूस्ती झाल्याचे समजते. ब्रिटीशकाळापासून खारेपाटण पोलीस ठाण्यामध्ये गणेश चतुर्थीत न चुकता गणपतीची मूर्ती बसवली जाते. पोलीस कर्मचारी भक्तीभावाने पूजाअर्चा करतात. गावाच्या गणपतीबरोबर याचे विसर्जन केले जाते, हे येथील वैशिष्ट्य आहे व ते आजपर्यंत टिकवून ठेवण्यात आले आहे.
ऐतिहासीक ओळख
पूर्वीच्या अखंड रत्नागिरी जिल्ह्यातील विजयदुर्ग बंदराला लागून असलेली पोलीस चौकी व पोलीस वसाहत म्हणून खारेपाटणची ओळख होती. ५ पोलीस, १ हवालदार, १ जमादार असे एकूण ७ पोलीस कर्मचारी या पोलीस वसाहतीमध्ये आपल्या कुटुंबासहीत राहत होते.
बारा हजार लोकांमागे दोनच पोलीस कर्मचारी
खारेपाटण पोलीस ठाणे क्षेत्रात खारेपाटण, चिंचवली, वायंगणी, शेर्पे, बेर्ले, कुरूंगावणे, नडगिवे, वारगाव, साळीस्ते, शिडवणे अशी एकूण १० गावे येत असून सुमारे १२००0 लोकसंख्येला फक्त २ पोलीस कर्मचारीच येथे कार्यरत आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस कर्मचाऱ्यांचे संख्याबळ कमी पडत आहे. सध्या जमादार मोहन रावराणे, हवालदार सदानंद कदम व पांडूरंग तुपसुंदर हे काम पाहत असून बऱ्याचवेळा प्रशासकीय कामानिमित्त त्यांना ३८ किलोमीटर असलेल्या कणकवली येथे पोलीस ठाण्यात जावे लागते. तर गुन्ह्यांचा तपास करणे, नोटीस बजावणे, चेक पोस्टला ड्युटी करणे आदी कारणांमुळे खारेपाटण पोलीस ठाण्यात कधी कधी कर्मचारीच नसल्याचे दिसते. तसेच रात्री- अपरात्री एखादा गुन्हा, भानगड घडल्यास पोलिसांना शोधत जावे लागते.