कविता करताना कवीने भान ठेवावे

By Admin | Updated: January 28, 2015 00:56 IST2015-01-27T21:16:54+5:302015-01-28T00:56:36+5:30

राजा शिरगुप्पे : कणकवलीत ‘उगवाई काव्य’ पुरस्कारांचे वितरण

The poets should keep in mind while doing poetry | कविता करताना कवीने भान ठेवावे

कविता करताना कवीने भान ठेवावे

कणकवली : केशवसूत यांनी आपल्या कवितेतून जी बंडाची तुतारी पुकारली, त्याचेच पडसाद आजच्या कवींच्या कवितांमध्ये उमटत आहेत. भविष्यात शस्त्राने नाहीतर शब्दशस्त्रानेच जगाला जिंकता येणार आहे. यासाठी आपण का लिहितो याचे भान कवीने ठेवायला हवे, असे प्रतिपादन दहाव्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. राजा शिरगुप्पे यांनी येथे ‘आवानओल प्रतिष्ठान’ आयोजित पाचव्या वसंत सावंत स्मृती उगवाई काव्योत्सवात केले. कणकवली नगरवाचनालयाच्या पू. पटवर्धन सभागृहात प्रा. शिरगुप्पे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ कवी नारायण लाळे, आवानओल प्रतिष्ठानचे अजय कांडर, विनायक सापळे, प्रा. मोहन कुंभार, राजेश कदम, अ‍ॅड. विलास परब, अच्युत देसाई, कल्पना मलये, आदी उपस्थित होते.औरंगाबादचे कवी श्रीधर नांदेडकर यांना त्यांच्या ‘परतीचा रस्ता नाहीय’ या काव्यसंग्रहासाठी वसंत सावंत स्मृती उगवाई काव्य पुरस्कार, तसेच बीड-आंबेजोगाईचे कवी बालाजी सुतार यांना द. भा. धामणस्कर काव्य पुरस्कार या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.यावेळी बोलताना प्रा. शिरगुप्पे म्हणाले, वर्तमानकाळ माणसाला उद्ध्वस्त करायच्या वाटेवर आहे. माणूस माणसालाच शत्रू बनवत चालला आहे. अशावेळी साहित्यिकांची तसेच साहित्य चळवळीची जबाबदारी मोठी आहे. याच जबाबदारीने आवानओल प्रतिष्ठान साहित्यिकांना मंच उपलब्ध करून देतानाच माणसाच्या मनातील ओल जपण्याचे काम करत आहे, हे आजच्या बदलत्या काळात फार मोलाचे आहे. कवी नारायण लाळे म्हणाले, कवीच्या जगण्याची नितळता कवितेत दिसायला हवी. अर्थात कवीचे जगणेच प्रामाणिक असेल तर तो कवितेत प्रामाणिक दिसत असतो. कारण आपण विचार करतो तसेच लिहित असतो. आवानओल प्रतिष्ठानच्यावतीने वसंत सावंत यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येत आहेत, हे चांगले काम आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्कर यांच्या नावाने गुणवान नव्या कवीला पुरस्कार देण्यात येत असल्याने नव्या कवींना प्रेरणाच मिळणार आहे.श्रीधर नांदेडकर म्हणाले, वसंत सावंत उगवाई काव्य पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आले, हा कोकणच्या मातीने केलेला माझा सन्मान आहे. या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली आहे. बालाजी सुतार म्हणाले, घर उठून बाजारात आले आणि बाजार घरात आला. अशा विचित्र काळात आपण जगत आहोत. जगण्यातला निरागसपणा संपून गेला आहे. आजच्या काळातील ताप माझ्या कवितेत आला पाहिजे, असे मला वाटत असल्याने माझ्या कवितेत वर्तमानकाळ लिहीत असतो. कार्यक्रमाचा प्रारंभ डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मरणार्थ श्रीधर पाचंगे यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतगायनाने करण्यात आला.यावेळी दर्पण सांस्कृतिक मंचचे उत्तम पवार, राजेश कदम, तसेच श्रीधर पाचंगे यांचा सत्कार करण्यात आला. अ‍ॅड. विलास परब यांनी प्रास्ताविक केले, तर राजेश कदम यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)


काव्यसंमेलनाने रंगत
खुल्या काव्यसंमेलनात श्रीधर नांदेडकर, डॉ. अनिल कांबळी, वीरधवल परब, डॉ. अनुजा जोशी, प्रा. मोहन कुंभार, बालाजी सुतार, प्रा. अनिल फराकटे, सुजाता गायकवाड, नीलम सावंत-पालव, मंजुनाथ पाचंगे, सागर होळकर, कल्पना मलये, समृद्धी मलये, उदय सर्पे, राजस रेगे, नीता कामत, समीक्षा येडवे, महेश वालावलकर, सिद्धार्थ तांबे, बाळा शिरसाट, आदींनी कविता सादर केल्या. या कार्यक्रमात काव्यसंमेलनाने आणखीनच रंगत आणली.

Web Title: The poets should keep in mind while doing poetry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.