पिंगुळकर यांची फेरचौकशी;
By Admin | Updated: July 12, 2014 00:24 IST2014-07-12T00:12:59+5:302014-07-12T00:24:25+5:30
सावंतवाडी पालिका बैठकीत उमटले पडसाद

पिंगुळकर यांची फेरचौकशी;
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिकेचे सर्वेअर बाबू पिंगुळकर यांच्यावर नागरिकांच्या तसेच नगरसेवकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी असल्याने पालिकेने चौकशी समिती नेमली होती. पण या चौकशी समितीने पिंगुळकर यांच्या आरोपावर पांघरूण घातल्याने पालिकेने आता नव्याने फेरचौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आता चौकशी होणार आहे.
याबाबत शुक्रवारी झालेल्या पालिका बैठकीत तसे आदेश देण्यात आले आहेत. सावंतवाडी नगरपालिकेची मासिक बैठक नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, नगरसेवक देवेंद्र टेमकर, अफरोझ राजगुरू, शर्वरी धारगळकर, किर्ती बोंद्रे, संजय पेडणेकर, अॅड. सुभाष पणदुरकर, विलास जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
प्रथम पालिकेचे सर्वेअर बाबू पिंगुळकर यांनी कामात केलेली अनियमितता तसेच अनेक बेकायदेशीर बांधकामांना पाठीशी घालण्यात आल्याच्या प्रकरणाचा अहवाल पालिका बैठकीत ठेवण्यात आला होता. पण या अहवालात अनेक त्रुटी असल्याचे दिसून आले. तसेच पिंगुळकर यांचे पद चौकशी समितीतील अधिकाऱ्यांपेक्षा मोठे असल्याने चौकशी करताना बऱ्याच अडचणी येत होत्या. त्यातच चौकशी समितीने पिंगुळकर यांच्या आरोपांवर पांघरूण घालत अहवाल पिंगुळकर यांच्या बाजूने दिला. त्यामुळे बैठकीत त्यांचे पडसाद उमटले.
अखेर नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी बाबू पिंगुळकर यांच्या असलेल्या आरोपांबाबत सत्य माहिती पुढे येणे गरजेचे असल्याने फेरचौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून या समितीत कार्यलयीन अधीक्षक आसावरी शिरोडकर, अभियंता तानाजी पालव, प्रिया परब आदींची नेमणूक करण्यात आली आहे. ही समिती तीन महिन्यात आपला अहवाल पालिकेला सादर करणार आहे. त्या निर्णयानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्षांनी बैठकीत
दिली. (प्रतिनिधी)