आरोग्याकडे लक्ष द्या
By Admin | Updated: November 3, 2014 23:25 IST2014-11-03T21:46:10+5:302014-11-03T23:25:49+5:30
सुचिता वजराठकर : भातकापणीबाबत शेतकऱ्यांना आवाहन

आरोग्याकडे लक्ष द्या
वेंगुर्ले : परतीचा पाऊस व वातावरणातील बदलामुळे साथ रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन येथील पंचायत समिती सभापती सुचिता वजराठकर यांनी केले आहे. तालुक्यातील चारही आरोग्य केंद्रांमध्ये पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असल्याचीमाहिती यावेळी त्यांनी दिली. साथ रोगांवर योग्य ती उपाययोजना आरोग्य विभागाकडून घेण्यात येत असून सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यालयात उपस्थित राहण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या. आरोग्य कर्मचाऱ्यांकडून जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. अवेळी पडणारा पाऊस, तसेच सततच्या वातावरणातील बदलांमधून डेंग्यू अथवा लेप्टो स्पायरेसिससारख्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ढगाळ वातावरण, तसेच कमीअधिक थंडी यामुळे आजारास मोठ्या प्रमाणात निमंत्रण मिळते. याच दरम्यान जिल्ह्यात भातकापणीचा हंगाम सुरू होतो. आरोग्य विभागाबरोबरच जनतेनेही सतर्क राहून साथींच्या रोगांपासून दूर राहण्याबाबत उपायोजना करणे आवश्यक आहे. केवळ शासनावर अवलंबून राहून चालणार नाही. त्यासाठी स्वत: अलर्ट रहा असे आवाहन सुचिता वजराठकर यांनी केले. (प्रतिनिधी)
हयगय झाल्यास संपर्क साधा
तापसरीसारख्या साथ रोगांवर उपाययोजना करण्यात वेंगुर्ले तालुका पूर्ण सक्षम असून आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी जनजागृती तसेच गृहभेट घेण्यात मग्न आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याच्या सक्त सूचनाही देण्यात आल्या आहेत. तापाच्या रुग्णांनी जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन उपचार करून घ्यावेत. उपचाराच्या दरम्यान कर्मचाऱ्यांकडून हयगय झाल्यास रुग्णांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वजराठकर यांनी पत्रकारांशी बोलताना केले.