अंधांना दृष्टी देण्यासाठी अभियानात सहभागी व्हा

By Admin | Updated: October 6, 2014 22:41 IST2014-10-06T21:23:38+5:302014-10-06T22:41:59+5:30

सह्याद्री निसर्ग मित्र : नेत्रदानाला विशेष महत्त्व

Participate in the mission to look after blind people | अंधांना दृष्टी देण्यासाठी अभियानात सहभागी व्हा

अंधांना दृष्टी देण्यासाठी अभियानात सहभागी व्हा

चिपळूण : भारतीय संस्कृतीमध्ये दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मग ते कन्यादान, भूदान असो की मतदान. यामध्ये सर्वश्रेष्ठ दान म्हणजे नेत्रदान आहे. सर्व धर्मात नेत्रदानाला मान्यता असून, वाल्मिकी रामायणात नेत्रदानामुळे मोक्ष प्राप्त होतो, असे म्हटले आहे. बुद्ध धर्मातही नेत्रदानाचे महत्त्व सांगितले जात आहे. त्यामुळे अंधांना दृष्टी देण्यासाठी नेत्रदान अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन सह्याद्री निसर्ग मित्रचे अध्यक्ष भाऊ काटदरे यांनी केले आहे.
मार्कंडी येथील वंदना सुहास पंडित यांनी मरणोत्तर नेत्रदान व देहदान करुन समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. संघर्ष क्रीडा मंडळाच्या सहकार्याने सांगली येथील दृष्टीदान आयबँक यांच्या पाठिंब्यावर डॉ. किल्लेदार, डॉ. ग. ल. जोशी, डॉ. संजीव शारंगपाणी, डॉ. वाघमारे, डॉ. मुकादम, डॉ. अनुपमा जोशी व नॅबचे डॉक्टर यांच्या सहकार्याने नेत्रदान अभियान सुरु आहे.
जगातील ३ कोटी ९० लाख अंध व्यक्तींपैकी २० टक्के म्हणजे ७ लाख ८० हजार अंध भारतात आहेत. त्यातील ६० टक्के मोतीबिंदूमुळे, तर २ टक्के कॉर्नियाच्या खराब होण्यामुळे आहेत. १ लाख ५६ हजार अंधांना जर नेत्रदानापासून कॉर्निया उपलब्ध झाला तर त्यांच्या जीवनातील अंधकार दूर होऊ शकतो. भारतात आजही १ लाख कॉर्नियाच्या अभावाने अंधकारात जीवन जगत आहेत. त्यांना प्रकाश देण्याचे काम करावयाचे आहे.
मागील वर्षापासून नेत्रदानाची सोय चिपळूण येथे करण्यात आली आहे. नेत्रदान म्हणजे मृत्यूनंतर ६ तासांच्या आत माणसाच्या डोळ्यामधील काळ्या बुबुळावरचे १/२ मिलिमीटरचे पारदर्शक पटल काढून ते अंध व्यक्तींना बसवले जाते. यामध्ये पूर्ण डोळा काढला जात नाही. चेहरा जशाच्या तसा राहतो. मृत्यूपूर्वी नेत्रदान अर्ज भरला नसला तरी नातेवाईकांच्या संमतीने नेत्रदान होते. कोणत्याही वयातील व्यक्तीचे नेत्र उपयोगात येतात. वाल्मिकी रामायणात तर नेत्रदानाने मोक्ष प्राप्त होतो, असे लिहिले आहे. मोतिबिंंदूच्या आॅपरेशनानंतरही नेत्रदान करता येते. नेत्रदान मोहिमेत सहभागी होऊन अंधांना दृष्टी देण्याच्या कार्यात हातभार लावावा, असे आवाहन सह्याद्री निसर्गचे भाऊ काटदरे, सेक्रेटरी उदय पंडित यांनी केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Participate in the mission to look after blind people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.