Parkar should know his strength before criticizing: Sameer Nalawade | पारकर यांनी टीका करण्यापूर्वी आपली कुवत ओळखावी : समीर नलावडे यांची टीका

पारकर यांनी टीका करण्यापूर्वी आपली कुवत ओळखावी : समीर नलावडे यांची टीका

ठळक मुद्देपारकर यांनी टीका करण्यापूर्वी आपली कुवत ओळखावी समीर नलावडे यांची टीका

कणकवली : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यामुळेच संदेश पारकर यांना कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष पद मिळाले होते . त्यानंतर पारकर यांच्या नशिबी कोणतेच पद आले नाही . पारकर आता ज्या पक्षात आहेत तेथे त्यांना साधे पक्षाचे घटनात्मक पदही दिलेली नाही . त्यावरून त्यांनी आपली कुवत ओळखावी. अशी टीका कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केली आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, संदेश पारकर हे सत्ताधारी पक्षात असून सुद्धा गेले सहा महिने त्यांना अंगरक्षकासाठी झटावे लागत आहे . खरे तर त्यांना अंगरक्षकांची गरज काय ? हा प्रश्न न उलगडणारा आहे ?

सत्ता असून देखील शासकीय अंगरक्षक मिळत नाही हि पारकर यांची राजकारणातील उतरती कळा आता त्यानी ओळखावी . नारायण राणेंवर टीका करून स्वतःचे अस्तित्व दाखवणाऱ्या पारकर यांनी राजकारणातील आपले निवृत्तीचे वय झाले हे ध्यानात घ्यावे . सुरुवातीला काँग्रेस , राष्ट्रवादी त्यानंतर पुन्हा काँग्रेस , नंतर भाजपा व आता शिवसेना एवढे पक्ष बदलूनही पारकर यांना फक्त नारायण राणे यांनीच पद दिले . राणेंनी साथ सोडल्यानंतर पारकरांच्या नशिबी पराभवच आले . त्यामुळे आपली कुवत ओळखून पारकर यांनी आपली जीभ चालवावी .

नारायण राणेंवर टीका करून प्रसिद्धीच्या झोतात राहणाऱ्या पारकर यांना कणकवलीकरांनी नाकारले आहे .
पारकर यांनी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांवर टीका करणे म्हणजे स्वतःची लाल करण्यातला प्रकार आहेत . नारायण राणेंकडून पद घेऊन कृतघ्न झालेल्या पारकर यांनी पदाच्या लालसेपोटी त्यांची परत साथ सोडली . पण त्यांची मर्यादा कणकवली पुरतीही राहिली नसल्याची जाणीव कणकवलीकरानी नगरपंचायत निवडणुकीत करून दिली .

पारकर यांना शिवसेनेकडून पण पद दिले जात नाही . कारण पारकर जास्त काळ कुठल्याच पक्षात राहत नाहीत.त्यामुळे शिवसेनेत ते किती काळ राहतील याचा कोणालाच भरोसा नाही . नितेश राणे यांच्यावर आरोप करून पारकर स्पर्धेत राहू पाहत आहेत . परंतु नितेश राणे यांचा मागील निवडणुकीतील विजय २८ हजार मताधिक्याने झाला .

जे कणकवली शहर सांभाळू शकले नाहीत त्यांनी विधानसभेत विजयी उमेदवारावर बोलावे यातूनच यांची वैचारिक दिवाळखोरी दिसून येते . दरवेळी पक्ष बदलायचे व आपल्या स्वार्थासाठी आपल्या सोबत इतर कार्यकर्त्यांना दुसऱ्या पक्षाच्या दावणीला बांधायचे ही पारकर यांची वृत्ती ओळखल्यामुळेच ते राहत असलेल्या प्रभागातही त्यांचा कार्यकर्ता शिल्लक राहिलेला नाही .

नारायण राणेंवर बोलले की आपल्याला राणे विरोधक म्हटले जाईल या भावनेतून पारकर यांची टीका सुरू असते . परंतु त्याच नारायण राणे यांनी आपल्याला पद दिले होते हे ते सोयीस्कर रित्या विसरले आहेत. असेही समीर नलावडे यांनी म्हटले आहे.

 

Web Title: Parkar should know his strength before criticizing: Sameer Nalawade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.